…तर मी खासदारकीचा राजीनामा देईल : इम्तियाज जलील

टीम महाराष्ट्र देशा : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर वंचित आघाडीत फुट पडली आहे. वंचित आघाडी अध्यक्ष प्रकाश आंबेडकर आणि औरंगाबादचे खा. इम्तियाज जलील यांच्यात चांगलीच जुंपली आहे. आम्ही केवळ एमआयएम अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांच्या शब्दाला मन देतो. त्यामुळे इम्तियाज जलील यांनी काढलेल्या पत्रकाला मानत नाही, असे प्रकाश आंबेडकर म्हणाले होते. यावर इम्तियाज जलील यांनी उत्तर दिले आहे.

प्रकाश आंबेडकर यांचा माझ्यावर राग कां आहे? हे माहित नाही. पण मी जे पत्रक काढले ते ओवेसी यांच्या परवानगीनेच काढले होते. ती आमच्या पक्षाची अधिकृत भूमिका आहे. ओवेसी हे माझे गॉडफादर आहेत. त्यांनी सांगितले तर दोन मिनिटांत प्रदेशाध्यक्ष पदाचा व खासदारकीचा राजीनामा देईल, असे जलील म्हणाले.

तसेच विधानसभा निवडणुकांची तयारी करायला पुरेसा वेळ देता यावा, ओवेसींच्या सभांचे नियोजन करता यावे यासाठी ज्या जागा द्यायच्या आहेत, त्या आम्हाला सांगा अशी आमची मागणी होती. पण आम्ही इम्तियाज जलील यांच्याशी बोलणार नाही, ओवेसी यांच्याशी आमची चर्चा सुरू आहे असे सांगत वंचितच्या प्रवक्त्यांनी पत्रके काढत दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. ओवेसींनी वंचितकडे 17 जागांची यादी दिली होती, हा शोध कुणी लावला असा सवाल देखील इम्तियाज यांनी यावेळी केला.

दरम्यान प्रकाश आंबेडकर यांनी आपला मान राखला नाही. त्यामुळे एमआयएम पक्ष स्वबळावर लढणार आहे. याबाबतची माहिती इम्तियाज जलील यांनी पत्रक काढून दिली होती. मात्र या पत्रकाला आम्ही मानत नाही असे प्रकाश आंबेडकर म्हणाले होते. यावरून प्रकाश आंबेडकर आणि इम्तियाज जलील यांच्यात आरोप प्रत्यारोप सुरु झाले.