‘आतापर्यंत २४ घोटाळे समोर आणले, एकूण ४० घोटाळ्यांचा पर्दाफाश करणार’, किरीट सोमय्यांची माहिती

‘आतापर्यंत २४ घोटाळे समोर आणले, एकूण ४० घोटाळ्यांचा पर्दाफाश करणार’, किरीट सोमय्यांची माहिती

kirit somayya

लातूर : राज्यात आपण आतापर्यंत २४ प्रकरणांत घोटाळे उघडकीस आणले आहेत. ४० घोटाळे उघड करण्याचे आपले टार्गेट असल्याचे भाजपा नेते तथा माजी खासदार किरीट सोमय्या यांनी सांगितले. ‘आपल्याला महाराष्ट्र घोटाळेमुक्त करायचा आहे. महाराष्ट्र राज्य बँक घोटाळाप्रकरणी उच्च न्यायालयाने काही संस्थांच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. त्या संस्थांपैकी दोन संस्था लातूर जिल्ह्यातील असून त्यांची चौकशी होईल’, असेही सोमय्या यांनी म्हटले. बुधवारी ते लातूर येथे पत्रकार परिषदेत बोलत होते.

सक्तवसुली संचालनालयाने सलग दहा दिवस उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या व त्यांच्या कुटुंबीयांशी संबंधित संस्थांवर धाडी टाकत चौकशी केली. सुमारे १ हजार ५० कोटींच्या बेहिशेबी मालमत्तेचा ईडीने तपास केला. या प्रकरणावरून लक्ष वळवण्यासाठी राज्य सरकारने समीर वानखेडे प्रकरण उकरून काढले आहे. समीर वानखेडे यांचा धर्म काय? त्यांची जात कोणती? त्यांचे कितवे लग्न आहे? आदी प्रश्नांवर निरर्थक चर्चा घडवून आणली जात असल्याचा आरोप सोमय्या यांनी केला.

आम्ही घोटाळेबाजांना सोडणार नाही. आयकर विभागाला अनेक गोष्टी सापडल्या आहेत. ईडीही मागे लागलीय. लातूरनंतर नांदेडचा विषय पुढे जाणार. नांदेडला अशोक चव्हाण यांनी साखर कारखाने हडपले आहेत. आम्ही ईडीकडे जाणार आणि तक्रार दाखल करणार, असा इशाराही सोमय्या यांनी यावेळी दिलाय.

महत्त्वाच्या बातम्या