दोन वेळा राष्ट्रपती पुरस्कार व १७ विविध पुरस्कार मिळवलेले नसडगाव एक स्मार्ट व्हिलेज

जालना / नारायण काळे: जालना जिल्ह्य़ातील नसडगाव हे साधारण पणे ८०० ते १००० लोकसंख्या असलेले गाव. दहा वर्षांपूर्वी वेगळे म्हणावे असं काही गावात नव्हते. मात्र आपल्या गावाचे काहीतरी अस्तित्व असावे. गाव स्वच्छ, सुंदर असावे. गावात चांगली शाळा, प्रत्येकाला चांगले घर प्रत्येकाकडे शौचालय, गावातील सांडपाण्याचे चांगले व्यवस्थापन व्हावे असं प्रत्येकालाच वाटायचे. मात्र पुढाकार कुणीच घेत नव्हते.

एक दिवस सर्व गावकऱ्यांनी एक ग्रामसभा घेवून गावात अमुलाग्र बदल घडवून आणण्याचा निर्धार केला. गावाने सर्व वैयक्तिक मतभेद विसरून गावाला विकसित करण्याचा वसा घेतला. प्रत्येक चांगल्या निर्णयाला गावकऱ्यांनी फक्त पाठींबाच दिला नाही तर प्रत्यक्ष श्रमदान केले. आज संपूर्ण गावात सिमेंट रस्ते, रस्त्यांवर सौरऊर्जेवर चालणारे दिवे, प्रत्येक घरी शौचालय व त्याचा नियमित वापर, गावातील सांडपाण्याचे भुमीगत व्यवस्थापन येथे करण्यात आले आहे. गावातील शाळा देखील आदर्श गावाला साजेशी अशीच. शाळेचा परिसर विविध झाडाफुलांनी नटलेला. शाळेत प्रोजेक्टच्या साह्याने विद्यार्थ्यांना अवघड विषय सोपे करून शिकवले जातात.

गावामध्ये पिण्याच्या पाण्याचेदेखील उत्तम नियोजन करण्यात आलेले आहे. गावातील प्रत्येक गल्लीत लोखंडी पाईपलाईन आहे. प्रत्येक घराला नळाद्वारे पाणी पुरवले जाते. या पाण्याचा आवश्यक तेवढाच वापर व्हावा म्हणून प्रत्येक नळाजवळ एक मीटर बसवण्यात आले आहे. त्याद्वारे कोणी किती पाणी वापरले याची रिडींग ग्रामपंचायतीला कळते अन त्याप्रमाणेच पाणीपट्टी आकारली जाते. गावाच्या विकासाबरोबरच पर्यावरणाचा समतोल साधलेला येथे पहावयास मिळतो. येथील प्रत्येक घरासमोर एक नारळाचे झाड लावण्यात आले आहे. दहा वर्षांपूर्वी लावलेल्या या झाडांना आता चांगलीच नारळे लगडली आहेत.

गावातील लोकांशी आणि सरपंच गणेशराव देशमुख यांच्याशी संवाद साधला असता. सर्व मतभेद विसरून गावाचा विकास हा एकच ध्यास घेऊन सर्व गावकऱ्यांनी प्रयत्न केल्यामुळेच हे शक्य झाल्याचे सांगितले. गावातील सरपंचांनी तत्कालीन राष्ट्रपति एपीजे. अब्दुल कलाम यांच्या हस्ते पुरस्कार स्वीकारणे, हा जीवनातील अविस्मरणीय क्षण असुन दिल्लीतील विज्ञान भवनातील तो सोहळा डोळ्याचे पारणे फेडणारा होता. अशा शब्दांत आपल्या भावना व्यक्त केल्या.

नसडगाव ने अवघ्या दहा वर्षात केलेली प्रगती गावातील लोकांच्या एकीचे आणि सामुहिक प्रयत्नांचे फलित आहे. या गावाचा आदर्श परिसरातील इतर गावांनी घेतल्यास ‘स्मार्ट सिटी’ च्या धर्तीवर स्मार्ट व्हिलेज ही संकल्पना रूढ होऊन ती एक लोकचळवळ बनण्यासाठी वेळ लागणार नाही. तेव्हा गरज आहे ती या गावाच्या पावलावर पाऊल ठेवून एका स्मार्ट व्हिलेज कडे गावाची वाटचाल करण्याची.

You might also like
Comments
Loading...