‘स्मार्ट सोडा.. इथल्या रस्त्यावर खड्डे चुकवून गाडी चालवायला आर्ट लागतं’

टीम महाराष्ट्र देशा : कल्याण-डोंबिवली परिसराची स्मार्ट सिटी मध्ये काही दिवसांपूर्वीच निवड झाली होती मात्र ती निवड कागद पत्रांपुर्तीच मर्यादित राहिली आहे. मात्र इथल्या परिसरातील अवस्था दयनीय आहे. रस्ते वाहतुक व्यवस्था पाणी प्रश्न अश्या विविध मागण्यांसाठी प्राजक्त झावरे-पाटील यांनी कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेचे गोविंद बोडके यांना पत्र लिहून त्यांच्या व्यथा मांडण्याचा प्रयत्न केला आहे. हे पत्र सोशल मिडीयावर व्हायरल झाले आहे. प्राजक्त झावरे-पाटील यांनी लिहिलेलं हे पत्र जसंच्या तसं…

प्रति,

मा. गोविंद बोडके.
आयुक्त,
कल्याण-डोंबिवली महानगरपालिका.

विषय:- कल्याण-डोंबिवलीला जगण्यास सुसह्य बनविणेबाबत…

आदरणीय आयुक्त साहेब,
जय महाराष्ट्र!! (म्हणजे मी शिवसैनिकच आहे असा अर्थ न घेतलेलाच बरा..)
खूप दिवसापासून तुमच्याशी बोलायचं होते, अगदी भरभरून आपल्या घराबाबत आणि शहराबाब, परंतु कालपर्यंत अपघातात गेलेल्या ५ बळींनी ते बोलायला भाग पाडले. एक दीड वर्षांपूर्वी पेपरमध्ये वाचलं की कल्याण-डोंबिवलीची स्मार्ट सिटीत निवड झाली असून, देशातले ते एक स्मार्ट शहर बनेल. आनंदाची बातमी होती.आणि या बातमीला आता बरेच दिवस उलटून गेलेत, हे ऐकले होते हेच काळाच्या खूप आत पडद्याआड गेलंय…
सर, स्मार्ट सोडा.. इथल्या रस्त्यावर खड्डे चुकवून गाडी चालवायला आर्ट लागतंय.. आणि आता पावसाळ्यात तर गंमत विचारूच नका.. पाठीचा कणा लवचिक करूनच इथं रस्त्यावर कल्याणकर उतरतोय.कल्याणच्या रस्त्यांचे गिनीज बुकात नोंद करण्यासारखं अजून एक कारण म्हणजे बनवलेला रस्ता कायम खोदला जाणे.. रस्ता बनविताना त्यात पाईप आणि अजून काय काय टाकायचं राहून जाते काय माहीत, की तो कमीत कमी सतरा वेळा खोदला जातो..खोदला की परत बनायला किती दिवस लागतात हे न सांगितलेच बरं.कल्याण-डोंबिवली नगरीचा रस्त्याच्या बाबतीतला अजुन एक विशेष म्हणजे सगळे रस्ते अर्थवट सोडलेले.. जसे कुठे अर्धी बाजू बनवली आहे, (उरलेली अर्धी बनवेपर्यंत पहिली बनविलेली कामाला निघालेली असते), कुठे साईडचा गटारावरील फूटपाथ राहिलेला, कुठे मधला डिव्हायडरचा खड्डा तसाच गाड्यामध्ये अडकण्यासाठी मोकळा ठेवलेला!! कुठे नव्या रस्त्यात मध्येच पेव्हर ब्लॉक सापडतात तेही अर्धवट,( बहुतांशी ड्रेनेज च्या टाकीच्या भोवती अर्थवट सोडलेले) गाड्या आदळूनच पुढे जाण्यासाठी.

बरेच रस्ते असे आहेत की ,ते मध्येच संपतात, अचानक सिंगल होतात… तेहीही वर्षानुवर्षे तसेच पडून आहेत जसे रोनक सिटी ते सिनेमॅक्स सिनेमा व्हाया वसंत व्हॅली..बरेच रस्ते असे आहेत की ते रस्ते आहेत की पार्किंगची ठिकाणे हेच कळत नाही, मोठ्या ट्रक-चारचाकी-दुचाकी गाड्या अनेक रस्त्यांचा श्वास घोटतात ,त्या रस्त्याला महापालिकेने अधिकृत गाडी लावण्याची जागा म्हणून घोषित करावे ,जसे गोविंदवाडी बायपास..

रस्ता आणि हे आपलं शहर याचा सगळ्याच बाबतीत छत्तीसचा आकडाच आहे हे पदोपदी जाणवत राहते.. अनधिकृत म्हणून रस्त्याच्या बाजूच्या सगळ्या बांधकामांची धडाक्यात साफसफाई मात्र झाली पण त्या जागेवर रस्ता कधी होणार ??? की परत अनधिकृत सांगाडे ती जागा पटकावून आपली दुकाने सुरु करणार हा सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.. महापालिका त्याचीच वाट पाहत आहे का? असं मन मेंदूला विचारत राहते. शेजारच्या ठाणे महापालिकेत बांधकाम काढले की लगेच खडी टाकून ती जागा रस्ता म्हणून नावारूपाला आणली जाते पण कल्याण-शिळ रोड(कल्याण-डोंबिवली महापालिका हद्द, ठाण्याच्या हद्दीत बनविले आहेत) किंवा लालचौकी-पडघा रस्ता अजूनही तसाच पडलेल्या अवस्थेत आपल्या घटका मोजत आहे..
कल्याण ऐतिहासिक नगरी आहे हे मान्य पण म्हणून अजूनही त्याच ऐतिहासिक रस्त्यानेच धोपट प्रवास करावा का? .. भिवंडी-ठाणे, उल्हासनगर, पनवेल इ. महत्वाच्या शहरांना जोडणारे पर्यायी मार्ग विकसित होणे गरजेचे आहे.. ते कधी होणार तो विश्वनिर्माता ब्रह्मदेवच जाणे बहुतेक..स्टेशनच्या परिसरात तर गाडी चालवणे सोडाच पायी चालणे सुद्धा मोठी कला आहे.. फेरीवाल्यांनी टाकलेला हा विळखा कुणाच्या आशीर्वादाने चालतो ,देव जाणे…

तसेच रस्त्यावरील कचऱ्याचे ढीग व त्याचा सुगंध प्रत्येक नागरिकाला आता आपलासा वाटू लागला आहे.. त्या पौष्टीक खताच्या वासानी प्रत्येक चौक आकंठ तृप्त होताना दिसत आहे.आमच्या KDMT बाबत तर न बोललेच बरे.. ती बिचारी झेपेल तेवढे करते आहे.अजून बरंच काही सलतय.. वेळ काढून परत नंतर नक्कीच बोलेन.. सर, आपण मोठी पदे याआधी भूषवली आहेतच.. त्यामुळे ही नगरी आपल्याकडे आशेने पाहत आहे.. आपल्या शेजारीच एका तुकारामांने(तुकाराम मुंढे) नवी-मुंबई सरळ केली तर एका संजीव( संजीव जयस्वाल) ने ठाण्याला चंद्रशेखरानं नंतर नवीन संजीवनी दिली… असच काहीतरी आपल्याकडून आम्हाला अपेक्षित आहे.. ही महापालिका कुणाची स्वतःची जहागीर नाही , ही आम्हा सामान्यांची आहे.. आपण उत्तम काम करा इथला प्रत्येक माणूस आपल्या पाठीमागे भक्कम उभा राहील..

साहेब, भले आम्हाला स्मार्ट नका करू पण जगायला सुसह्य तरी करा, हीच भाबडी अपेक्षा..
आणि हो…. सध्या जगात क्रांतीचे दिवस आहेत हे विसरू नका इतकेच…

 

आपलाच,
प्राजक्त झावरे-पाटील
रौनक सिटी ,कल्याण

शहा तसे बोललेच नाहीत, राम मंदिराच्या मुद्यावर भाजपचा कोलांटउड्या

महावितरणच्या मोबाईल ॲपला २७ लाख ग्राहकांची पसंती