लवकरच ग्रामीण भागातही सुसाट धावणार स्मार्ट सिटी बस

औरंगाबाद : शासनाचे स्पष्ट निर्देश असतानाही एसटी महामंडळाने शहरापासून २० किलोमीटरपर्यंत सिटी बससेवेला नाहरकत प्रमाणपत्र (एनओसी) देण्यास टाळाटाळ करत मनमानी चालवली आहे. दरम्यान, मागील महिन्यात करमाडपर्यंतच सिटीबस धावण्यास सुरूवात झाली. या मार्गावर सिटीबसचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे इतर फुलंब्री, वेरूळ, बिडकीन मार्गांवरही चांगला प्रतिसाद मिळण्याची अपेक्षा आहे.

ग्रामीण भागातील नागरिकांना देखील या सुविधा मिळायला हव्यात यासाठी पाठपुरावा करू अशी भूमिका पालकमंत्री सुभाष देसाई यांनी आज पत्रकार परिषदेत ऑनलाईन माध्यमातून मांडली. त्यामुळे लवकरच ग्रामीण भागातही स्मार्ट सिटी बस सुसाट धावण्याचे संकेत मिळाले आहेत.

औरंगाबाद महापालिकेला सिटीबस सेवा शहरापासून वीस किलोमीटरच्या परिघापर्यंत चालवण्याची शासनाची मुभा आहे. त्यानुसार पालिकेने स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनच्या माध्यमातून एसटी महामंडळाला करमाड, फुलंब्री, वेरुळ आणि बिडकीनपर्यंत सिटीबस चालवण्याबद्दलचा प्रस्ताव सादर केला आहे. वीस किलोमीटरपर्यंत बस चालवता येणे शक्य असल्याचे गृहीत धरून तशी तयारी देखील स्मार्ट सिटीबस विभागाने केली.

यासंदर्भात स्मार्ट सिटीबस विभागाचे मुख्य व्यवस्थापक प्रशांत भुसारी यांनी सांगितले की, एसटी महामंडळाने केवळ करमाडपर्यंतच सिटीबस चालवण्याची परवानगी दिली आहे. मागील महिनाभरापासून या मार्गावर ग्रामीण भागातील नागरिकांची सोय झाली असून त्यांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.

मात्र फुलंब्री, वेरुळ आणि बिडकीनचा प्रस्ताव अद्याप एसटी महामंडळाने मान्य केलेला नाही. त्यांनी हा प्रस्ताव मंजूर करावा, यासाठी पालिकेचे प्रशासक आस्तिककुमार पांडेय पाठपुरावा करीत आहेत.

एसटीपेक्षा सिटीबस स्वस्त
स्मार्ट सिटीबसचे भाडे हे एसटी महामंडळापेक्षा कमीच आहे. शिवाय एसटीच्या धाब्यांचाही प्रश्न आहे. करमाडप्रमाणे फुलंब्री, वेरूळ, बिडकीनपर्यंत सिटीबस सुरू झाल्यास प्रत्येक दोन किलोमीटरवर सिटीबसचे थांबे असतील. यामुळे खेड्यापाड्यांतील नागरिकांची चांगली सोय होणार आहे. मात्र एसटीने आडकाठी घातली असल्याने आता पालिका प्रशासक तथा आयुक्त आस्तिककुमार पांडेय काय निर्णय घेतात, याकडे लक्ष लागले आहे.

महत्त्वाच्या बातम्या