२१ स्मार्टफोन उत्पादक कंपन्यांना केंद्र सरकारची नोटीस, माहिती चोरीचा संशय

नवी दिल्ली :स्मार्टफोनचे उत्पादन करणाऱ्या २१ कंपन्यांना  केंद्र सरकारकडून नोटीस बजावण्यात आली आहे. नोटीस बजावण्यात आलेल्या कंपन्यांमध्ये ओप्पो , व्हिओ , शिओमी , जिओनी या चीनच्या कंपन्यांचा समावेश आहे . या कंपन्या लोकांची माहिती चोरून त्याचा गैरवापर करत असल्याच्या संशयामुळे सरकारने  माहितीच्या सुरक्षेसाठीच्या प्रणालीचा तपशील देण्याचे आदेश या कंपन्यांना दिले आहेत. २८ ऑगस्टपर्यंत कंपन्यांना अहवाल सादर करण्यास सांगण्यात आले आहे. नोटीस बजावण्यात आलेल्या कंपन्यांमध्ये ॲपल, सॅमसंग व मायक्रोमॅक्स या कंपन्यांचाही समावेश आहे ..   भारतात चीनी बनावटीच्या स्मार्टफोनची विक्री अधिक प्रमाणात होते. त्यामुळे स्मार्टफोनमधील माहिती चोरली जात असेल तर वापरकर्त्यांना त्याचा मोठा फटका बसणार आहे. देशात दरवर्षी २० ते २२ कोटी स्मार्टफोन विकले जातात. सायबर क्राइमचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असून त्या पार्श्वभूमीवर सरकारकडून हे महत्त्वपूर्ण पाऊल उचलले गेले आहे.