तेलगाव येथील ट्रॉमा केअर युनिटचे काम संथगतीने

बीड: जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे, या वाढत्या कोरोना रुग्णांच्या संख्येमुळे येथील रुग्णालयांमध्ये खाटा अपुऱ्या पडत असल्याने नवीन कोरोना बाधित रुग्णांना उपचारासाठी जागा मिळत नसल्याने रुग्णांचे हाल होत आहेत. रुग्णांची वाढती संख्या पाहता नवीन कोविड केअर सेंटर सुरु करण्यात येत आहेत, मात्र अजूनही काही ठिकाणी कोविड सेंटर सुरु करण्यासाठी संथगतीने काम सुरु आहे. जिल्ह्यातील तेलगाव येथील ट्रॉमा केअर युनिटमध्ये कोविड केअर सुरु करण्याचे आदेश काही दिवसांपूर्वी जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांनी दिले होते,मात्र अजूनही काम पूर्ण झाले नाहीये.

बीड जिल्ह्यातील दळणवळणाचे व प्रमुख रस्त्याचे ठिकाण असलेल्या तेलगाव येथे सुसज्ज असे ट्रॉमा केअर युनिट उभारले आहे. मात्र आरोग्य विभागाच्या उदासीनतेमुळे कोट्यवधी रुपये खर्च करून उभारलेली ही इमारत धूळ खात पडून होती. येथे ५० बेडचे कोविड सेंटर चालू करावे, अशी मागणी तेलगाव येथील ग्रामपंचायत, सामाजिक कार्यकर्ते यांनी गेल्या काही दिवसांपासून लावून धरली होती. या सर्वांच्या प्रयत्नाला यश मिळाले असून, येथे ५० बेडचे कोविड सेंटर चालू करण्यासाठी आरोग्य विभागाने मंजुरी दिली.

सोमवारी दुपारी पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी तेलगाव येथील ट्रॉमा केअर युनिटमध्ये चालू करण्यात येणाऱ्या नियोजित कोविड सेंटरला भेट देऊन येथील बेड, आवश्यक साधनसामग्री, ऑक्सिजन पाॅइंटसह इमारतीची पाहणी करून सर्व परिस्थितीचा आढावा घेतला. येथील कोविड सेंटर चालू करण्यासाठी लागेल ती मदत करण्याचे आश्वासन दिले व आरोग्य विभागाने आवश्यक कामे तत्काळ पूर्ण करून येत्या आठ दिवसात हे कोविड सेंटर चालू करावे, असे आदेश आरोग्य विभागास दिले. या वेळी वैद्यकीय अधीक्षक डाॅ. सुरेश साबळे व इतर वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते.

महत्वाच्या बातम्या