पक्षाची रसद कापण्यासाठी युतीच्या ‘ह्या’ मंत्र्याला घेरण्याच्या तयारीत भाजप

मुंबई/प्राजक्त झावरे-पाटील :  मध्यवर्ती निवडणुकीचे बिगुल आता लवकरच वाजतील. ‘एक देश, एक निवडणूक’ हा नारा भाजपने अजेंड्यावर घेतला असल्याने महाराष्ट्र विधानसभा निवडणूक लोकसभेच्या निवडणुकीसोबत होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे सर्वच पक्ष आपली रणनीती आखण्यासाठी कंबर कसू लागले आहेत.

महाराष्ट्रात सध्या शिवसेना-भाजप युतीच राज्य असले तरी छोटा भाऊ कोण आणि मोठा भाऊ कोण यावरून नेहमीच एकमेकांची उणी-दुणी काढून या दोन सत्ताधारींमधील संघर्ष अगदी टोकाला गेला आहे. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी वेळोवेळी भाजपवर टीका करत निवडणुका स्वतंत्र लढायची घोषणा केली आहे. तर तिकडे मुख्यमंत्री फडणवीस देखील स्वतंत्र लढण्याची चाचपणी करत आहेत. त्यादृष्टीने त्यांनी पाऊल टाकत आपली रणनीती तयार केल्याचे भाजपच्या गोटातील चर्चेवरून स्पष्ट होत आहे.

आपल्या सहकारी मित्राला चितपट करायचे असेल तर त्या पक्षाला सर्वाधिक रसद पुरविणाऱ्या वजीराला घेरणे महत्वाचं असल्याचं भाजप मध्ये दबक्या आवाजात बोलले जात आहे. शिवसेनेत प्रभावशाली नेत्याची त्यामानाने वानवा आहे. सुभाष देसाई, रामदास कदम, दिवाकर रावते हे नेते विधान परिषदेवर आहेत. मात्र सेनेचे विधानसभेतील नेते एकनाथ शिंदे यांचा ठाणे-पालघर जिल्ह्यावर वरचष्मा असून तेच शिवसेनेला निवडणुकीत रसद पुरवू शकतात हे भाजपाने हेरले आहे. त्यामुळे शिंदे यांची राजकीय पकड सैल करणे हा भाजपाचा अजेंडा आहे.

एकनाथ शिंदेसह ७ आमदार, २ खासदार अशी पक्षाची ताकद त्यांनी लाटेच्या विरोधात देखील ठाण्यात टिकवली नव्हे वाढवली. कल्याण पूर्व मतदारसंघ जवळपास ८०० मतांनी तर कल्याण पश्चिम मतदारसंघ १५००-२००० च्या थोड्याश्या फरकाने पडले. तसेच प्रतिष्ठेच्या ठाणे मनपा निवडणूकित एक हाती सत्ता मिळवत २५ वर्षाची सेनेची सत्ता एकनाथ शिंदेंनी आबादीत ठेवली. मुख्यमंत्र्यांनी प्रतिष्ठेची केलेल्या कल्याण-डोंबिवली मनपा निवडणुकीत सेनेचा महापौर बसवून शिंदेंनी आपली क्षमता नि चुणूक तर दाखवलीच तसेच इतिहासात पहिल्यांदाच ठाणे जिल्हापरिषदेत जवळपास एकहातीच सत्ता मिळवून सेनेचे अध्यक्ष बसवले. या सर्वच आघाड्यांवर सर्वांना टक्कर देत त्यांनी आपली ताकद दाखवली आहे. ठाणे जिल्ह्यातील पंचायत समिती, नपा, काही मनपा यात सेना सत्तेत आहे, हे केवळ शिंदे यांच्या करिष्म्यावर.!
स्व. आनंद दिघे यांच्या मुशीत तयार झालेले शिंदे शेवटच्या सैनिकापर्यंत पोहचले असल्याने त्यांना ग्राउंड झिरोची माहिती आहे. शिवसैनिकांवर प्रेम करणारा नेता अशी त्यांची छबी असल्याने शिवसैनिक देखील तेवढ्याच कष्टाने कोणत्याही अपेक्षेशिवाय त्यांच्या सोबत उभे राहतात त्याचमुळे प्रत्येक निवडणूक ते विजयासमीप नेताना दिसत आहेत. अतिशय मुत्सद्दी राजकारणी म्हणून त्यांची ओळख राजकीय वर्तुळात निर्माण झाली आहे. बेरजेचे राजकारण हा त्यांच्या राजकारणाचा पिंड असल्याने ते सहजासहजी कुणालाही आपलंसं करू शकतात. सगळयाच पक्ष्यातील लोकप्रतिनिधी-पदाधिकारी यांच्याशी त्यांचा उत्तम संपर्क आहे. एकंदरीत ठाणे-पालघरवर एकनाथ शिंदे यांचा एकछत्री अंमल आहे.

शिंदेंनी हळू-हळू महाराष्ट्रावर आपली जादू करायला सुरवात केली आहे. पालघर पोटनिवडणूक, कोकण पदवीधर या निवडणुकांमध्ये त्यांचा अतिशय थोड्या मतांनी पराभव आला असला तरी पहिल्यांदाच निवडणूक लढून भाजपच्या नाकात त्यांनी दम आणला होता. पालघरसाठी तर उत्तरप्रदेशातून मुख्यमंत्री योगी यांच्यासह मोठी टीमचं निवडणुकीत उतरली होती. तसेच शिवसेनेतील निम्म्याहून डजनभर अधिक सेनेचे आमदार शिंदे साहेब समर्थक असल्याच्या चर्चा दबक्या आवाजात कानावर देखील पडू लागल्या आहेत. त्यामुळेच भाजपला धक्का देण्याची ताकद असणारा एकच नेता सेनेत असल्याचे बोलले जात आहे , ते म्हणजे मंत्री एकनाथ शिंदे.

त्यामुळे त्यांना घेरण्यासाठी भाजप पूर्णपणे कंबर कसत असून ठाणे-पालघरमधील कोणी आपल्या गळाला लागते का? हेही तपासात आहे. परंतु एकनाथरावांची पक्षनिष्ठा, शिवसैनिकांवरील पकड, बेरजेचे राजकारण, विकासाची झालर , प्रेमळ स्वभाव, प्रचंड कष्ट करावयाची क्षमता आदी त्यांच्या गुणांमुळे त्यांना घेरणे भाजपला नक्कीच सोप्पे जाणार नाही. पण भाजप त्यांना रोखण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करेल, हे मात्र नक्की.

आज छत्रपती शिवाजी महाराज भाजपला ‘भलते’ वाटू लागले – आमदार जयंत पाटील