फुटीच्या उंबरठ्यावर असणाऱ्या माकपच्या सरचिटणीसपदी सीताराम येचुरी यांची फेरनिवड

टीम महाराष्ट्र देशा- मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या सरचिटणीसपदी सीताराम येचुरी यांची फेरनिवड करण्यात आली आहे. हैदराबाद येथे सुरू असलेल्या पक्षाच्या २२ व्या अधिवेशनात येचुरी यांच्या निवडीवर शिक्कामोर्तब करण्यात आले.येचुरी यांना दुसऱ्यांदा पक्षाचे राष्ट्रीय नेतृत्व देण्याचे बहुमताने मान्य करण्यात आले आहे. याच बरोबर पक्षाच्या विविध महत्त्वांच्या पदांसाठी एकूण ९५ अधिकाऱ्यांची निवड देखील करण्यात आली आहे.

सीताराम येचुरी यांच्या तीन वर्षांचा कार्यकाळ नुकताच संपला होता. माकप नेते प्रकाश करात यांचा गट दुसऱ्या नावासाठी आग्रही होता. त्यामुळे येचुरी यांच्या फेरनिवडीवर शंका उपस्थित केली जात होती. पक्षाच्या पॉलीट ब्युरोच्या आज झालेल्या बैठकीत येचुरी यांच्या निवडीचा प्रस्ताव मांडण्यात आला होता. ज्यात दुसऱ्यांदा पक्षाचे राष्ट्रीय नेतृत्व देण्याचे बहुमताने मान्य करण्यात आले .

दरम्यान भाजपला हरवण्यासाठी काँग्रेसला पाठिंबा देण्याच्या मुद्द्यावरून मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षात रणसंग्राम सुरु झाला आहे. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षातील दोन दिग्गज नेते सिताराम येचुरी आणि प्रकाश करात आता आमने-सामने आले होते. या ठरावावर गुप्त मतदान घेण्याची मागणी पुढे आल्यानंतर कारत यांची भूमिका मागे पडली. त्यामुळे माकपने येचुरी यांनी मांडलेला काँग्रेससोबत जाण्याचा पर्याय सध्या तरी पक्षाने खुला ठेवला आहे.

Loading...

भाजपचा संपूर्ण पराभव, हिंदुत्ववादी विचारांचे विघटन आणि देशाचा आर्थिक विकास हे तीनच मुद्दे बैठकीच्या केंद्रस्थानी आहेत. गेल्या आठवड्या भरापासून या तीन विषयांवर अनेक बाजूनी या बैठकीमध्ये चर्चा करण्यात आली आहे. तसेह येत्या २०१९ च्या निवडणुकांच्या दृष्टीने देखील पक्षाची काय ध्येयधोरणे असतील यावर सर्व प्रतिनिधींबरोबर चर्चा करण्यात आली.

बलाढ्य भाजपला निवडणुकीत चारी मुंड्या चीत करण्यासाठी विरोधी पक्ष एकत्र येणे आवश्यक आहे, मात्र त्यासाठी पक्षाच्या ध्येयधोरणांशी तडजोड बऱ्याच विरोधी पक्षातील नेत्यांना मान्य नाही. शिवाय कॉंग्रेसच्या नादाला लागून आपल्या पक्षाचं नुकसान का करून घ्यावं असा देखील एक मतप्रवाह मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षात आहे. त्यामुळे या समस्येवर तोडगा काय निघतो हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

Loading...