सरन्यायाधीश दीपक मिश्रांविरोधात महाभियोग आणण्याची तयारी

महाभियोग आणण्यासाठी माकप आग्रही

नवी दिल्ली: सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्याविरोधात महाभियोगाचा प्रस्ताव आणण्याची तयारी विरोधीपक्षांनी केली आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान संसदेत सरन्यायाधीशांविरोधात महाभियोग प्रस्ताव आणण्याच्या शक्यतेवर विरोधीपक्ष विचार करत आहेत, असं मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे महासचिव सीताराम येचुरींनी सांगितलं.

न्यायमूर्ती चेलमेश्वर, न्यायमूर्ती रंजन गोगोई, न्यायमूर्ती मदन भीमराव लोकुर आणि न्यायमूर्ती कुरियन जोसेफ यांनी 12 जानेवारीला पत्रकार परिषद घेऊन, सुप्रीम कोर्टाचं कामकाज सुरळीत चालत नसल्याचं म्हटलं होतं.तसेच महत्वाच्या खटल्यांच्या वाटपात सरन्यायाधीशांकडून अनियमितता होत असल्याचा गंभीर आरोप सर्वोच्च न्यायालयाच्या 4 न्यायमूर्तींनी केला होता.

काँग्रेसही महाभियोगसाठी अनुकूल असल्याचे समजते. ‘सुप्रीम कोर्टातील न्यायाधीशांमधील वाद हा गंभीर प्रकार आहे. आमचे नेते या आठवड्याच्या शेवटी एक बैठक घेतील आणि महाभियोगला पाठिंबा द्यायचा की नाही याबाबत अंतिम निर्णय घेण्यात येईल, असे सूत्रांनी सांगितले. राज्यसभेत विरोधकांकडे बहुमत असल्याने तिथेच महाभियोगाचा प्रस्ताव सर्वप्रथम मांडला जाईल, असे सांगितले जाते.