सीतेचं अपहरण रामाने केलं; संस्कृत विषयाच्या पाठयपुस्कात अजब शोध

अहमदाबाद : रावणाने नाही, तर रामाने सीतेचं अपहरण केल्याचा अजब धडा पुस्तकात छापल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. गुजरातमध्ये इयत्ता 12वीच्या संस्कृत विषयाच्या इंग्रजी माध्यमाच्या पुस्तकात असा वादग्रस्त मजकूर छापण्यात आला आहे. ‘इंट्रेडक्शन टू संस्कृत लिटरेचर’ या पुस्तकातील 106 क्रमांकांच्या पानावर ही चूक आहे.

राम चरित्राचं वर्णन करताना सीतेच्या अपहरणाबद्दल लिहिण्यात आलं आहे. पण तेथे रावणाच्या जागी राम हा शब्द लिहिण्यात आला आहे. म्हणजेच रामाने सीतेचं अपहरण केलं होतं असं या लेखात म्हटलं आहे. कालिदास यांच्या ‘रघुवंशम’मधून हा परिच्छेद घेतला असल्याची माहिती देण्यात आली.

दरम्यान, अधिकाऱ्यांनी पुस्तकातील चुकीसाठी भाषांतराला जबाबदार धरत स्वतःवरील जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न केला असून, ‘सीतेचं अपहरण रामने नाही, तर रावणाने केलं होतं हे सर्वांना माहिती आहे. ‘रघुवंशम’मध्येही तसाच उल्लेख आहे. लवकरच ही चूक सुधारून दोषींवर योग्य ती कारवाईची मागणी करणार असल्याचं माजी संस्कृत प्रोफेसर वसंत भट्ट यांनी सांगितलं.

You might also like
Comments
Loading...