बहिणीच्या छेडछाडीचा जाब विचारल्यावरून चौघांवर हल्ला, १६ जणांवर गुन्हा दाखल

molestation-bid crime

सांगली : बहिणीची छेड काढल्याचा जाब विचारल्याच्या कारणावरून सुमारे १६ जणांच्या टोळक्याने रविवारी रात्री केलेल्या हल्ल्यात गौरव विलास गायकवाड (वय २३, रा. भारतनगर, कोल्हापूर रस्ता) याच्यासह चौघेजण जखमी झाले आहेत. ही घटना सांगली- कोल्हापूर रस्त्यावरील भारतनगर परिसरात घडली.

या घटनेमुळे या संपूर्ण परिसरात कमालीचे तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले असून सोमवारी रात्री उशिरापर्यंत सांगली शहर पोलिसांना संशयितांचा ठावठिकाणा लागला नव्हता. गुन्हा दाखल झालेल्यात चिंतामणी शिकलगार, अक्षय शिकलगार, करण शिकलगार, ओंकार शिकलगार, हुजेफ पन्हाळकर, किशोर शिकलगार व राम कोळी याच्यासह अन्य नऊजणांचा समावेश आहे.

या हल्ल्यानंतर हे सर्वजण फरार झाले असून त्यांच्या शोधासाठी सोमवारी दुपारनंतर सांगली शहर पोलिसांची पथके रवाना झाल्याचे सांगण्यात आले. मावस बहिणीची छेड काढल्याचा जाब विचारण्यास गेलेल्या गौरव गायकवाड याला चिंतामणी शिकलगार याच्यासह १६ जणांनी लोखंडी रॉड व दांडक्यांनी बेदम मारहाण केली. त्यावेळी सोडवणूक करण्यास आलेल्या सुधीर सावंत, केतन गायकवाड व गणेश तोडसकर या त्याच्या मित्रांनाही बेदम मारहाण झाली.

ही घटना भारतनगर येथील साई मंगल फॅब्रिकेशनसमोर रविवारी रात्री साडे सात वाजण्याच्या सुमारास घडली. याबाबत गौरव गायकवाड याने सांगली शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.