fbpx

‘सैराट’ बापटांच्या शिकवणीसाठी हेडमास्तर हवाय!

girish bapat sairat

पुणे: पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट हे गेल्या काही दिवसांपासून आपल्या अजब-गजब विधानांमुळे चांगलेच चर्चेत येताना दिसत आहेत. आधी एका वर्षानंतर सरकार बदलणार असल्याचे विधान करून बापट यांनी स्वपक्षातच खळबळ उडवून दिली. तर आता एका शाळेमधील कार्यक्रमात विद्यार्थीनी समोर बोलताना बापट यांचा तोल सुटल्याने त्यांच्यावर टीकेची झोड उठली आहे.

बापट यांच्या विधानाचा निषेध नोंदवत राष्ट्र्वादी महिला कॉंग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी “सैराट’ बापटांच्या शिकवणीसाठी हेडमास्तर हवाय!!! त्वरित संपर्क साधवा’ लिहिलेले खास पुणेरी स्टाईल पोस्टर शहरभरात लावले आहेत. तसेच स्वामी विवेकानंदांच्या नावाचा उल्लेख करत बापट यांनी महिलांचा अवमान केल्याने भाजप नेतृत्वाने त्यांचा राजीनामा घ्यावा अशी मागणी राष्ट्रवादी महिला कॉंग्रेसच्या शहराध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी केली आहे.

नेमक काय आहे पालकमंत्र्यांचे ‘ते’ विधान

‘स्वामी विवेकानंद परदेशात गेले होते. तेव्हा त्यांच्या व्यक्तिमत्त्व आणि भाषणामुळे आकर्षित झालेल्या परदेशी युवतीने विवेकानंदांना भेटून त्यांच्याशी लग्नाची इच्छा व्यक्त केली. ‘आपण लग्न केले तर आपल्याला तुमच्यासारखा तेजस्वी मुलगा होईल अशी इच्छा तिने व्यक्त केली..  मात्र यावर उत्तर देत स्वामी विवेकानंद म्हणाले ‘लग्न करण्याची गरज नाही. मी तुम्हाला मातेसमान मानतो, तुम्ही मला मुलगा माना… तो काळच वेगळा होता. अन् आता ‘चल, म्हटली की चालली’! अशी शेरेबाजी बापट यांनी काल पुण्यातील श्री. ना. दा. ठाकरसी कन्याशाळेच्या शताब्दीपूर्तीच्या कार्यक्रमात बोलताना केली होती.

गिरीश बापट यांनी अशा प्रकारची शेरेबाजी करण्याची हि पहिलीच वेळ नसून या आधीही ‘एमपीएससी’च्या विद्यार्थ्यांसमोर बोलताना त्यांचा तोल गेला होता. त्यावेळी ‘तुम्ही ज्या क्लिप रात्री बघता त्या सगळ्या मला माहीत आहेत. रात्री सगळेजण कोणत्या आणि कुठल्या कुठल्या क्लिप बघतात. कारण तुम्ही जे पाहता ते मी पण पाहतो. त्यामुळे आम्ही म्हातारे झालो असे काही समजू नका. ‘आमचं देठ अजून हिरवं आहे’ असे वक्तव्य बापट यांनी केले होते.