fbpx

सिंहगड महाविद्यालय दुर्घटना : दोषींवर कारवाई करणार, कोणालाही सोडणार नाही : जिल्हाधिकारी

टीम महाराष्ट्र देशा : मुसळधार पावसामुळे पुण्यातील आंबेगाव येथील सिंहगड कॉलेजची सीमाभिंत मजुरांच्या झोपड्यांवर कोसळून मध्यरात्री दीडच्या सुमारास झालेल्या भीषण दुर्घटनेत सहाजण मृत्युमुखी पडले असून चारजण जखमी झाले आहेत. तब्बल १५ जणांचा बळी घेणारी कोंढव्याची दुर्घटना ताजी असतानाच त्याची पुनरावृत्ती आंबेगाव येथे घडली आहे. या घटनेची चौकशी करणार असून दोषींवर कारवाई करू, अशी प्रतिक्रिया पुण्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिली.

यावेळी नवल किशोर राम म्हणाले की, तीन दिवसातील ही दुसरी दुर्घटना खरोखरच दुर्दैवी आहे. आजच्या घटनेत मानवी आणि नैसर्गिक दोन्ही चुका आहेत. दोषी असणाऱ्यांवर प्रशासन योग्य ती कारवाई करेल. जखमी आणि मृत्युमुखी पडलेल्यांच्या नातेवाईकांना योग्य ती मदत सरकारच्या वतीने दिली जाईल. पुढे ते म्हणाले कोंढव्याच्या घटनेनंतर समिती स्थापन करण्यात आली असून मुदतबाह्य इमारतींची तपासणी सुरू आहे.

दरम्यान आंबेगाव येथील सिंहगड कॅम्पसच्या सीमाभिंतीलगत मजुरांच्या तात्पुरत्या झोपड्या होत्या. सर्वजण गाढ झोपेत असताना हा सीमाभिंत अचानक कोसळली आणि त्याखाली मजुरांच्या झोपड्या गाडल्या गेल्या. पडलेल्या भिंतीच्या ढिगाऱ्याखाली मजूर आणि त्यांचे कुटुंबीय अडकून पडले.