fbpx

शुक्रतारा निखळला! ज्येष्ठ भावगीत गायक अरुण दाते यांचं निधन

टीम महाराष्ट्र देशा- ‘शुक्रतारा मंद वारा चांदणे पाण्यातुनी’…’येशील येशील येशील, राणी पहाटे पहाटे येशील’…’भातुकलीच्या खेळामधली राजा आणिक राणी’….’दिवस तुझे हे फुलायचे’…’अखेरचे येतील माझ्या, तेच शब्द ओठी’…आणि ‘या जन्मावर, या जगण्यावर शतदा प्रेम करावे’…अशा हळुवार आणि सुरेल गीतांनी भावगीतांना नवा आयाम देत दोन पिढ्यांवर अधिराज्य गाजविणारे ज्येष्ठ भावगीत गायक अरुण दाते यांचं आज वृद्धापकाळाने निधन झाले. ते ८४ वर्षाचे होते. त्यांच्या जाण्याने भावसंगीताचा ‘शुक्रतारा’ निखळल्याची भावना व्यक्त होत आहे.

अरुण दाते यांचे वडील रामूभैय्या दाते इंदूरमधील प्रतिष्ठित गायक होते. वडिलांच्या इच्छेनुसार अरुण दाते यांनी गायन क्षेत्रात पाऊल ठेवलं. त्यानंतर १९५५ पासून आकाशवाणीवर गायला सुरुवात केली. वयाच्या पन्नाशीत त्यांनी भावगीतांवर लक्ष केंद्रित केलं. १९६२मध्ये अरुण दाते यांच्या शुक्रतारा मंदवारा या पहिल्या गीताची ध्वनिमुद्रिका प्रकाशित झाली. ‘शुक्रतारा मंद वारा चांदणे पाण्यातुनी’…’येशील येशील येशील, राणी पहाटे पहाटे येशील’…’भातुकलीच्या खेळामधली राजा आणिक राणी’….’दिवस तुझे हे फुलायचे’…’अखेरचे येतील माझ्या शब्द तेच कानी’…आणि ‘या जगण्यावर या मरण्यावर शतदा प्रेम करावे’…अशा हळुवार आणि सुरेल गीतांनी भावगीतांना नवा आयाम देत त्यांनी दोन पिढ्यांवर अधिराज्य केलं.
2010 पर्यंत अरुण दाते यांचे ‘शुक्रतारा’ या मराठी भावगीत कार्यक्रमाचे अडीच हजारांहून अधिक कार्यक्रम झाले आहेत. त्यांचे उर्दूतील आणि मराठीतील गीतांचे पंधराहून अधिक अल्बमही लोकप्रिय आहेत.

अरुण दाते यांनी लता मंगेशकर, आशा भोसले, अनुराधा पौडवाल, सुमन कल्याणपूर, सुधा मल्होत्रा, कविता कृष्णमूर्ती यांच्यासोबत अनेक द्वंद्वगीतं गायली आहेत.अरुण दाते यांनी ‘शतदा प्रेम करावे’ या नावे लिहिलेलं आत्मचरित्र 1986 मध्ये प्रसिद्ध झालं होतं. 2016 मध्ये हे पुस्तक पुनर्प्रकाशित करण्यात आलं.