‘मला अजूनही राज्य सरकारने महाराष्ट्र भूषण पुरस्कार दिलेला नाही’

टीम महाराष्ट्र देशा – अनाथ मुलांची मी आई होते, त्यांचा सांभाळ करते. अशा मुलांना खायला दोनवेळची भाकर मिळावी, यासाठी मी संपूर्ण महाराष्ट्रभर व्याख्याने देते. त्यातून मला मदत मिळते. कर्नाटकातही व्याख्याने दिली. माझी तळमळ आणि माझा उद्देश समजून घेऊन कर्नाटक सरकारने मला ‘कर्नाटक भूषण’ पुरस्कार दिला, पण मला अजूनही राज्य सरकारने महाराष्ट्र भूषण पुरस्कार दिलेला नाही, अशी खंत सामाजिक कार्यकर्त्या सिंधुताई सपकाळ यांनी व्यक्त केली.

दहिसर पूर्व येथे क्षितिज ग्रुप या संस्थेला 10 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त क्षितिज ग्रुपचे अध्यक्ष मंगेश पांगारे यांच्या संकल्पनेने क्षितिज कला क्रीडा महोत्सव 2019 चे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवाच्या उद्घाटनावेळी त्या बोलत होत्या.

सिंधूताईंनी अनेक खडतर प्रसंगाना तोंड देत देत हजारों अनाथ मुलांचा सांभाळ केला आहे.अनाथ मुलांना सांभाळून त्यांच्या जीवनाला दिशा देण्यासाठी सिंधुताई यांनी ममता बाल सदन संस्थेची स्थापना केली. त्यांच्या भोजन, कपडे अन्य सुविधा यांची उपलब्धता संस्थेकडून केली जाते. शिक्षण पूर्ण झाल्यावर येथील मुले आर्थिक दृष्ट्या स्वावलंबी होतील यासाठीही त्यांना मार्गदर्शन दिले जाते.आर्थिकदृष्ट्या स्वयंपूर्ण झाल्यावर या युवक युवतींना योग्य जोडीदार शोधून देणे आणि त्यांच्या विवाहाचे आयोजन करणे हे कार्यही संस्थेकडूनच केले जाते.