आपल्या दु:खाचे भांडवल न करता स्वावलंबी बनले पाहिजे : सिंधुताई सपकाळ

ज्येष्ठ समाजसेविका सिंधुताई सपकाळ

मुंबई : महिलांनी संकटाने खचून न जाता नव्या उमेदीने उभे राहिले पाहिजे. आपल्या दु:खाचे भांडवल न करता स्वावलंबी बनले पाहिजे असं आवाहन समाजसेविका सिंधुताई सपकाळ यांनी केलं आहे.माणदेशी महोत्सवाचे उद्घाटन आज उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते दादर येथील रवींद्र नाट्यगृहात झाले. यावेळी त्या बोलत होत्या.

माण देशी फाउंडेशनचे कार्य म्हणजे एक चमत्कार आहे. दुष्काळग्रस्तांसाठी चारा छावण्या, महिलांसाठी बँक, रेडिओ स्टेशन आदी उपक्रम आव्हान समजून पूर्ण केले असून हे कार्य म्हणजे मोठा चमत्कार आहे. महिलांच्या कष्टाला सन्मान देण्याचे काम ही संस्था करत आहे. असे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी सांगितले.

प्रास्ताविक माण देशी फाउंडेशनच्या प्रमुख चेतना सिन्हा यांनी केले. त्या म्हणाल्या की, प्रदर्शनाचे हे तिसरे वर्ष आहे. मुंबईतील नागरिकांना ग्रामीण भागातील शेतकऱ्यांनी कष्ट करून पिकवलेला शेतीमाल उपलब्ध व्हावा, यासाठी हे प्रदर्शन भरविण्यात आले आहे. शहरी भागातील नागरिक काय खातात आणि काय खावे याची जाणीव या महोत्सवातून होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

या महोत्सवातून ग्रामीण भागातील पारंपरिक कला लुप्त होऊ नये, त्याची शहरातील नागरिकांना ओळख व्हावी, असा महोत्सवामागचा हेतू असल्याचे चेतना सिन्हा यांनी सांगितले. दरम्यान, अशा प्रकारचे प्रदर्शन केवळ राज्यापुरते मर्यादित न राहता देशपातळीवर भरविण्याचा मानस श्रीमती सिन्हा यांनी व्यक्त केला.