सत्तेत आल्यापासून राष्ट्रवादीच्या फंडात तब्बल पाच पटीने वाढ

ncp fund

मुंबई : राजकीय पक्षांना दरवर्षी २ लाखांहून अधिक रकमांच्या देणग्यांची माहिती निवडणूक आयोगाला द्यावी लागते. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने २०१९-२०२० या वर्षात मिळालेल्या देणग्यांची माहिती निवडणूक आयोगाला दिली आहे. ही रक्कम गेल्या आर्थिक वर्षामध्ये मिळालेल्या देणगीपेक्षा ५ पटीने अधिक असल्याची माहिती समोर येत आहे. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे देण्यात आलेल्या देणगीदारांच्या माहितीमध्ये एका ‘अनपेक्षित’ देणगीदाराचा देखील समावेश आहे.

महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर सरकारमधील प्रमुख घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मिळालेल्या देणगीमध्ये मोठी वाढ झाली आहे. २०१९-२० या आर्थिक वर्षामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला ५९.९४ कोटी रुपये देणगी स्वरूपात मिळालेत. ही रक्कम गेल्या आर्थिक वर्षामध्ये मिळालेल्या देणगीपेक्षा ५ पटीने अधिक आहे. गतवर्षी राष्ट्रवादीला या स्वरूपातून १२.०५ कोटी रुपये मिळाले होते.

राष्ट्रवादीच्या २०१९-२०२० वर्षातील देणगीदारांमध्ये लोढा डेव्हलपर्सचा समावेश असून त्यांच्याकडून पक्षाला ५ कोटी रुपयांची देणगी मिळाल्याचं निवडणूक आयोगाला दिलेल्या माहितीमध्ये नमूद करण्यात आले आहे. विशेष म्हणजे लोढा डेव्हलपर्स ही कंपनी भाजप आमदार व मुंबई भाजपचे प्रमुख मंगल प्रभात लोढा यांच्या मालकीची आहे.

एका नामंकित इंग्रजी वृत्तसंकेस्थळाने याबाबत वृत्त दिलं आहे. वृत्तामध्ये मंगल प्रभात लोढा यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी, ‘मी प्रत्यक्षपणे व्यवसाय सांभाळत नाही. तुम्हाला याबाबतची माहिती हवी असल्यास कंपनीमध्ये संपर्क साधावा लागेल.’ असं सांगण्यात आलेल आहे. या सर्व प्रकरणामुळे सध्या तरी महाराष्ट्राच्या राजकारणात विविध चर्चेला उधाण आलेले पाहायला मिळत आहे.

महत्वाच्या बातम्या