आंदोलनाची नौटंकी करून पाप झाकता येणार नाही, हिंमत असेल तर…– नाना पटोले

nana patole

नवी-दिल्ली : ओबीसींच्या आरक्षणाच्या मुद्द्यावरून सध्या सर्वत्र आंदोलनं सुरु आहेत. याच पार्श्वभूमीवर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी टीका केली आहे. ते म्हणाले की,’राज्यातील ओबीसींच्या राजकीय आरक्षणाच्या मुद्द्यावर भाजपा सध्या करत असलेलं आंदोलन ही नौटंकी आहे’. तसेच ‘केंद्र सरकारने जातीनिहाय जनगणनेची आकडेवारी न दिल्याने आणि तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जिल्हा परिषद निवडणुका पुढे ढकलल्याने फक्त महाराष्ट्रातच नाही तर देशभरातील ओबीसींचे राजकीय आरक्षण धोक्यात आले आहे. त्यामुळे, आंदोलनाची नौटंकी करून त्यांना आपले हे पाप झाकता येणार नाही. हिंमत असेल तर भाजपाने नरेंद्र मोदी यांच्या विरोधात आंदोलन करावे’ असेही ते म्हणाले.

पुढे ते म्हणाले की,’केंद्र सरकारकडे जातीनिहाय जनगणनेची आकडेवारी असताना देखील ते ही माहिती राज्य सरकारांना देत नाहीत. सुप्रीम कोर्टानेही ओबीसी आरक्षणाच्या सुनावणीदरम्यान ओबीसींचा इम्पीरिकल डेटा मागितला होता. परंतु, केंद्राने तो जाणीवपूर्वक दिला नाही. मुख्यमंत्री असताना फडणवीस यांनी केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री थावरचंद गहलोत यांना पत्र लिहून ओबीसींचा इम्पिरीकल डेटा देण्याची मागणी केली पण केंद्राने तो दिला नाही. त्यामुळेच सर्वोच्च न्यायालयात ओबीसींचं राजकीय आरक्षण रद्द होण्याची नामुष्की ओढवली आहे’.

दरम्यान, ‘या परिस्थितीला मोदी सरकार जेवढं जबाबदार आहे तेवढंच फडणवीस सरकार देखील जबाबदार आहे’ असा आरोपही यावेळी पटोले यांनी केला आहे.

महत्त्वाच्या बातम्या