औरंगाबादची साधी माणसे! शिवा आणि पाशा यांचे अनोखे कार्य; एक खड्डे बुजवतो, तर दुसरा झाडे लावतो

औरंगाबाद : आपले शहर स्वच्छ, सुंदर, हरित असावे असे प्रत्येक नागरीकाला वाटते. मात्र यासाठी किती जण प्रयत्न करतात हा महत्त्वाचा मुद्दा आहे. मात्र शहरातील ती दोघे याला अपवाद ठरतात. दोघेही अशिक्षित, साधारण परिस्थिती असलेले. एक जण शहरात जिथजिथे खड्डे दिसतील ती भरत जातो, तर दुसरा शहरात झाडे लावत वृक्षवल्ली आम्हा सोयरे-वनचरे हा विचार प्रत्यक्ष जगत आहे. यांना ना कुठल्या प्रसिद्धीची हाव नाही कोणाच्या कौतुकाचा सोस. आपण या शहराचे परिसराचे काहीतरी देणे लागतो हिच यांच्या प्रामाणिकपणे सुरु असलेल्या कामाची साक्ष.

किराडपुऱ्यातील एका निमुळत्या गल्लीतून आत गेल्यावर सय्यद पाशा यांचे घर दिसते. महाराष्ट्र देशा प्रतिनिधी पाशा यांच्या भेटीसाठी त्यांच्या घरी पोहोचले. त्यावेळी आपण काहीतरी भारी वेगळे करत असल्याचे त्यांच्या ध्यानीमनीही नव्हते. शांत स्वभाव असलेले मात्र आपल्या कामातूनच जास्त बोलणारे सय्यद पाशा. ५५ वर्षीय पाशा सेंट्रल नाक्यासमोरील रस्त्यावर मासे विक्रीचा व्यवसाय करतात. कुटुंबात पत्नी, ३ मुले, भाऊ असा मोठा गोतावळा. कुटुंबीयांची जबाबदारी त्यांच्याच खांद्यावर. मात्र सर्व काही सांभाळत गेल्या दिड वर्षांपासून ते वृक्षांचाही सांभाळ करत आहेत.

ते राहत असलेल्या परिसरात वृक्षांची कमतरता त्यांना दिसून आली. नाही म्हणायला महापालिकेने काही वृक्ष लावली होती. मात्र ती नावालाच. पुढे ती झाडे जगली का मेली हे पाहायला प्रशासनाने कुठलीच खबरदारी घेतली नाही. हे सर्व पाहता पाशा यांनी मनपाने लावलेल्या झाडांना पाणी देण्यास सुरुवात केली. उन्हाळ्यात शहरात सर्वत्र पाण्याच्या नावाने बोंबाबोंब असताना कितीतरी लांब असलेल्या हातपंपावरुन ते पाणी वाहून आणत. आणि झाडांना देत.

पाशा यांच्याप्रमाणेच अजून एका अवलियाची कहाणी जाणून घेतली. औरंगाबाद शहर जितके मोठे तितके प्रगतशीलही आहे. मात्र शहराचा विस्तार वाढला आणि समस्याही. रस्ते, पाणी, कचरा या मूलभूत समस्या. त्यातल्या त्यात खड्डे हि शहरवासीयांची मोठी समस्या. मात्र प्रशासनाच्या नावाने बोटे मोडण्यातच आपण धन्य. मात्र या सर्वांना अपवाद असलेला ‘तो’, शिवा! शिवा एवढेच त्याचे नाव.

बांधकामाच्या ठिकाणी मजूर म्हणून काम करणारा शिवा. जेव्हा उरलेले माती, सिमेंटचे ब्लॉक, भरती त्याला इतरत्र फेकण्याचे काम मिळाले तेव्हा पहिल्यांदाच त्याने शहरातील खड्डे भरले. आणि गेल्या दहा वर्षांपासून शहरात जिथजिथे खड्डे दिसतील त्याची हातगाडी भरते आणि ती गाडी लोटत लोटत तो निघतो विकासाच्या वाटेवर. या वाटेवर कोणीही सोबती नाही. अतिशय कमी बोलणारा शिवा सांगतो मी आपल्या दिवंगत आईच्या स्मरणार्थ हे काम करतो. अनेक वर्षांपूर्वी भावाने घरातून हाकलून दिल्यानंतर शिवा कुठे राहतो कोणालाही माहीत नाही. त्याच्या या निस्वार्थी कामाची दखल प्रशासनाने घ्यायलाच हवी.

महत्त्वाच्या बातम्या

 

IMP