‘जालियनवाला व मावळ घटनेत साम्य; तेथेही पोलिसांना ‘वरून’ आदेश मिळाले,’ फडणवीसांचा घणाघात

मुंबई : उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी येथे झालेल्या हिंसाचारात शेतकऱ्यांसह अन्य काही व्यक्तींचा मृत्यू झाला. या घटनेमध्ये केंद्रीय गृहराज्यमंत्र्यांच्या मुलावर हत्येचा गुन्हा दाखल झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी या घटनेची तुलना जालियनवाला बाग हत्याकांडाशी करत केंद्र सरकारवर निशाणा साधला होता. त्यावर प्रत्युत्तर म्हणून भाजपने मावळ इथं शेतकऱ्यांवर झालेल्या गोळीबाराची आठवण करून दिली. मात्र, मावळमध्ये पोलिसांनी शेतकऱ्यांवर गोळीबार केला होता, असं पवार यांनी म्हटलं.

याबाबत बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, ‘जालियनवाला बाग इथं झालेल्या प्रकरणातही पोलिसांनीच हत्या केली होती, मात्र त्यांना आदेश वरून देण्यात आले होते. तसंच मावळच्या घटनेतही पोलिसांना आदेश देण्यात आले होते,’ असा घणाघात फडणवीस यांनी केला.

‘शरद पवार साहेबांची प्रेस कशासाठी होती, हेच लक्षात आले नाही. कारण ते अनेक विषयांवर बोलले. जालियानवाला बाग गोळीबारासाठी ब्रिटीश स्वत: गेले नव्हते, तर त्यांनी पोलिसांना गोळीबाराचा आदेश दिला. मावळमध्ये पोलिसांना गोळीबाराचे आदेशच होते. त्यामुळे मावळची घटना ही सुद्धा जालियनवाला बागसारखीच होती. कारण येथेही पोलिसांना आदेश देण्यात आले होते. प्रश्न असा आहे की, उत्तरप्रदेशच्या घटनेवर महाराष्ट्रात बंद केला जातो आणि तोही सर्व यंत्रणांचा वापर करीत, संपूर्ण दडपशाही करून’ अशी टीका फडणवीस यांनी केली आहे.

काय म्हणाले होते शरद पवार?

शरद पवार म्हणाले, मावळमध्ये जे घडलं त्याला राजकीय नेते जबाबदार नव्हते. मावळमधील घटनेमध्ये पोलिसांवर आरोप होता. मावळमध्ये स्थानिक भाजप नेत्यांनी आंदोलकांना चिथावलं. मावळच्या लोकांना भडकवायला कुणी प्रयत्न केले हे लक्षात आल्यावर आता मावळमधील नागरिकांनी राष्ट्रवादीच्या उमेदवाराला 90 हजार मतांनी विजयी केलं. मावळच्या जनतेला भाजपची भूमिका कळल्यामुळेच तिथे राष्ट्रवादीचा उमेदवार जिंकला असंही शरद पवारांनी म्हटलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या