कॉंग्रेस नेत्याच्या जावायानेच लावला ओरिएण्टल बँकेला लावला चुना

टीम महाराष्ट्र देशा- सध्या बँकांना चुना लावल्याची अनेक प्रकरणं समोर येत असून नीरव मोदी, मेहुल चोक्सीनंतर देशातील आणखी एका कंपनीने एका सरकारी बँकेला ९७ कोटींचा चुना लावला आहे. सीबीआयने ओरिएण्टल बँक ऑफ कॉमर्सचे (ओबीसी) ९७ कोटी रूपयांचे कर्ज न फेडल्याप्रकरणी संभौली शुगर लि.चे मुख्य व्यवस्थापकीय संचालक गुरमीतसिंग मान, उपसरव्यवस्थापक गुरूपालसिंग आणि अन्यविरोधात गुन्हा दाखल केला आहे. गुरूपालसिंग हे पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांचे जावई आहेत.

‘एएनआय’ या वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, संभौली शुगर लि.ने ओबीसी बँकेकडून १०९.०८ लाख कोटींचे कर्ज घेतले आहे. बँकेच्या तक्रारीनंतर सीबीआयने गुन्हा दाखल केला. रविवारी सीबीआयने कंपनीच्या दिल्ली, हापूड आणि नोएडा येथील आठ ठिकाणांवर छापे मारले. याप्रकरणी सीबीआयने सखोल तपास सुरू केला आहे. कर्ज देणाऱ्या अधिकाऱ्यांसह अनेक लोकांची भूमिका तपासली जात आहे. दरम्यान, अर्थमंत्री अरूण जेटलींनी जाणूनबुजून कर्ज न फेडणाऱ्यांना इशारा दिला आहे. सरकार अशा लोकांकडून प्रत्येक पैसा वसूल करेल, असे त्यांनी म्हटले आहे.यापूर्वी सीबीआयने रोटोमॅक या पेन तयार करणाऱ्या कंपनीचे मालक विक्रम कोठारी आणि त्यांचा मुलगा राहुल याला ३ हजार ६९५ कोटी रूपयांचे कर्ज न फेडल्याप्रकरणी अटक केली आहे. त्यांनी ७ बँकांकडून कर्ज घेतले पण ते फेडलेच नाही.

माध्यमांना मिळालेल्या वृत्तानुसार, उत्तर प्रदेशची कंपनी संभौली शुगर लि.ने २०१७ मध्ये ७४.९८ कोटी रूपयांचे नुकसान दाखवले होते. तर यापूर्वी डिसेंबर २०१६च्या तिमाहीत कंपनीचे १८.०९ कोटी रूपयांचे नुकसान झाले हेाते. विशेष म्हणजे ही कंपनी बॉम्बे स्टॉक एक्सचेंजमध्ये सूचीबद्ध असून देशातील सर्वांत मोठ्या साखर उत्पादकांपैकी एक आहे. सरकारी बँकांचे कर्ज चुकवले न गेल्यामुळे सीबीआयने कंपनीवर छापे टाकले. पंजाब नॅशनल बँकेचा (पीएनबी) ११ हजार ४०० कोटी रूपयांचा घोटाळा समोर आल्यानंतर अशा प्रकारचे हे आणखी एक प्रकरण आहे.

You might also like
Comments
Loading...