पराभवाचे साईड इफेक्ट : राहुल गांधींच्या बचावासाठी कॉंग्रेस नेत्यांची धावाधाव

टीम महाराष्ट्र देशा- १७ व्या लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपाने २०१४  च्या निवडणुकीपेक्षाही मोठं यश प्राप्त केलं आहे. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत भाजपाला ३०२  जागा मिळाल्या आहेत. तर एनडीएला ३५०  हून अधिक जागा मिळाल्या आहेत. तर दुसरीकडे विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसला सपाटून मार खावा लागला आहे. अवघ्या ५२  जागांवर काँग्रेस विजयी झालं आहे तर काही राज्यात काँग्रेसला भोपळाही फोडता आलेला नाही.

काँग्रेसमध्ये सध्या या पराभवावरुन चिंतन करण्याचं काम सुरु आहे. मात्र कॉंग्रेस नेत्यांना पराभवापेक्षा राहुल गांधीच्या राजीनाम्याचीच जास्त काळजी असल्याचे दिसून आले. काँग्रेसच्या पराभवाला फक्त राहुल गांधी जबाबदार नाहीत. राहुल गांधी यांनी पदावर राहावं. विचारपूर्वक निर्णय घेण्याची गरज आहे. काँग्रेसमध्ये अंतर्गत बदल करण्याची गरज आहेत ते नेतृत्वाने करावे. माझ्यासह इतर राज्यातील प्रदेशाध्यक्षांनी सामुहिक राजीनामे द्यावेत. पराभवाचं खापर राहुल गांधी यांच्यावर फोडता कामा नये असं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाणांनी सांगितले.

तर दुसऱ्या बाजूला मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ हे देखील गांधी याच्या बचावासाठी मैदानात उतरले आहेत. काँग्रेसच्या तुलनेत भाजपाचा निवडणूक प्रचार जोरात होता. नरेंद्र मोदी यांचे म्हणणं जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचविण्याचं काम केलं गेले मात्र काँग्रेसला अपेक्षितपणे तसं करता आलं नाही. राहुल गांधी यांच्या नेतृत्वावर कुठलंही प्रश्नचिन्ह नाही. राहुल गांधी हेच आमचे नेते आहेत आणि राहतील असं कमलनाथ यांनी सांगितले.