आलिया-रणवीरच्या नात्यावर सिद्धार्थचा खुलासा

टीम महाराष्ट्र देशा : अभिनेता रणबीर कपूर आणि अभिनेत्री आलिया भट यांच्या प्रेमाची सध्या जोरदार चर्चा आहे. दोघांनी आपल्या नात्याबद्दल स्पष्ट सांगितलं नसलं तरी इशाऱ्यांमध्ये त्यांनी प्रेमाचा स्वीकार केला आहे. विशेष म्हणजे नुकत्याच पार पडलेल्या आकाश अंबानीच्या साखरपुड्याला आलियाचा सामना एक्स बॉयफ्रेंड सिद्धार्थ मल्होत्राशी झाला. आलियाचा एक्स बॉयफ्रेण्ड सिद्धार्थ मल्होत्राने तिच्या आणि रणबीरच्या नात्यावर पहिल्यांदाच मत व्यक्त केलं आहे.

सिद्धार्थ आलिया-रणबीरच्या नात्याकडे कसा पाहतो, यावर त्याचं काय म्हणणं आहे, हे एका वेबसाईटने आपल्या वृत्तात सांगितलं आहे. सिद्धार्थच्या एका निकटवर्तीयानुसार,त्याला आलियाच्या निवडीवर कोणत्याही प्रकारचा आक्षेप नाही. आलियासोबतचं त्याचं नातं आता पूर्णत: संपलं असून ती फक्त त्याची चांगली मैत्रीण आहे.

‘स्टूडंट ऑफ द ईयर’ मधून आलिया आणि सिद्धार्थने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. या सिनेमाच्या वेळीच त्यांच्यातील नातं फुललं, बहरलं. अनेक वर्ष ते एकमेकांना डेट करत होते. ‘स्टुडंट ऑफ द इयर २’ च्या एका प्रमोशनल गीतासाठी हे दोघं एकत्र काम करणार असल्याचं म्हटलं जात आहे मात्र नुकतंच त्यांचं ब्रेकअप झालं आहे. यानंतर बॉलिवूडमध्ये आलिया आणि रणबीरच्या प्रेमाची चर्चा रंगू लागली. रणबीर कपूर आणि आलिया भट आगामी ‘ब्रह्मास्त्र’ सिनेमात एकत्र दिसणार आहेत.