fbpx

कर्नाटकात सर्व काही अलबेल, कॉंग्रेसचा दावा

मुंबई : कर्नाटकमध्ये सुरु असलेल्या राजकीय नाट्याचा नवा अंक आता सुरू झाला आहे. काँग्रेसच्या १० तर जनता दल सेक्युलरच्या तीन नाराज आमदारांनी शनिवारी विधासभा अध्यक्षांकडे राजीनामा सुपूर्द केला आहे. यापैकी ११ आमदारांची मुंबईतील एका आलिशान हॉटेलात राहण्याची व्यवस्था करण्यात आली असून काँग्रेस त्यांचे मन वळवण्याचा प्रयत्न करतं आहे.

काँग्रेसचे नेते आणि माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी मात्र कर्नाटकात सर्व काही अलबेल असून कुमारस्वामी सरकारला कोणताही धोका नसल्याचा दावा केला आहे. तसेच हे भाजपचं ऑपरेशन लोट्स असून आमदारांच्या बंडामागे भाजपचा हात असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. तर सिद्धरामय्यांनाच कुमारस्वामी यांचं सरकार पाडायचा असल्याचा आरोप भाजपने केला आहे.

कर्नाटकमध्ये भाजप सत्ता मिळविण्यासाठी घोडेबाजार करत असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. भाजपने मात्र, काँग्रेस आणि जेडीएसमध्ये असलेल्या असंतोषाला मोकळी वाट मिळाल्याचा दावा केला आहे. पैशाच्या जोरावर सत्ता मिळविण्यासाठी भाजपकडून प्रयत्न सुरु आहेत. कर्नाटक हे ताजे उदाहरण आहे, असा आरोप काँग्रेस प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी केला आहे.