तंत्रज्ञानाचा जास्त वापर केल्यास बाल शिक्षण सर्वदूर पोहचेल – माजी कुलगुरु वसुधा कामत

पुणे : बालशिक्षणाचे तंत्र समजून घेण्यासाठी तंत्रज्ञानाचा जास्तीत जास्त वापर केल्यास बाल शिक्षण सर्वदूर पोहचेल. यासाठी शिक्षकांचे व्यावसायिक प्रबोधन व विकास होणे आवश्यक आहे. तसेच तंत्रज्ञानाचा उपयोग शाळेत विद्यार्थ्यांची उपस्थिती तपासण्यापुरता न राहता त्यांचं बालपण जपत त्यांच्यावर संस्कार करण्यासाठी देखिल वापर झाला पाहिजे, असे प्रतिपादन मुंबईतील एसएनडीटी विद्यापिठाच्या माजी कुलगुरु वसुधा कामत यांनी केले.

महाराष्ट्र बालशिक्षण परिषदेच्या वतीने ‘बालशिक्षणाचे तंत्र आणि तंत्रज्ञान’ या विषयावर पुणे, नवी सांगवी येथे तीन दिवसीय राज्य अधिवेशन आयोजन करण्यात आले आहे. उद्‌घाटनाच्या पहिल्या सत्रात कामत बोलत होत्या. वसुधा कामत म्हणाल्या की, केंद्र सरकारने स्थापन केलेल्या ‘भारतीय शिक्षण धोरण समिती’ नुसार 2011 मध्ये 15 कोटी तर 2016 मध्ये 20 कोटी सहा वर्षांखालील बालकांची संख्या आहे.

या मधील 15 कोटी बालके भारतभरातील तेरा लाख पंच्चावन्न हजार अंगणवाड्यातून शिक्षण घेत आहेत. उर्वरीत बालके खाजगी शिक्षण संस्थातून शिक्षण घेतात असे गृहित धरले जाते. विद्यार्थी, शिक्षक, तंत्रज्ञान आणि शिक्षण या घटकांचा समावेश धोरण समितीत करण्यात आला आहे. यामध्ये मुलांना निर्णय प्रक्रियेत सहभागी करुन घ्यावे. यासाठी अध्ययन योग्य वातावरण शाळेत तयार केले पाहिजे. मुलही सर्वांगाने शिकत असतात. स्पर्श करणे, वास घेणे, हालचाली करुन, खेळून समजून घेणे यातून 6 वर्षांपर्यंत मुलांच्या 75 टक्के मेंदूचा विकास होतो. बालशिक्षण हे वय तीन ते सहा पर्यंत गृहित धरले आहे. मोबाईल तंत्रज्ञान वाईट नाही त्याचा योग्य वापर अपेक्षित आहे.

या वयोगटातील मुलांना इकोफ्रेन्डली आणि युजरफ्रेन्डली विकसित केले पाहिजे. त्याचे प्रशिक्षण पालकांना व शिक्षकांना देणे गरजेचे आहे. नवीन भाषा, नवीन खेळ, नवीन संकल्पना समजून घेण्यासाठी, शैक्षणिक, सामाजिक विकासासाठी समुहाने प्रयत्न केल्यास मुलं लवकर शिकतील. त्यातून त्यांची ग्रहण शक्ती वाढेल. असे मार्गदर्शन कामत यांनी केले