कार्यकर्त्यांनी ठरवावेत सोलापूर बाजार समितीचे उमेदवार – सुभाष देशमुख

Min-Subhash-Deshmukh

सोलापूर – सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत कोणाचीही उमेदवारी लादली जाणार नाही, कार्यकर्त्यांनीच उमेदवार ठरवावेत अशी सुचना सहकार व पणन मंत्री सुभाष देशमुख यांनी कार्यकर्त्यांच्या बैठकीत बोलताना दिली़ सोलापूर बाजार समितीच्या निवडणुकीबाबत चर्चा करण्यासाठी दक्षिण सोलापूर तालुक्यातील भाजपाच्या प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक बोलावण्यात आली होती़ या बैठकीत बोलताना सहकारमंत्र्यांनी निवडणूक तयारीला लागा असे संकेत दिले आहेत.

सहकारमंत्री म्हणाले की, बाजार समितीची निवडणुकीत शेतक-यांच्या थेट मतदानाने होणार आहे़ बाजार समितीत शेतक-यांच्या हिताचे रक्षण करणा-या कार्यकर्त्यांना संधी दिली जाणार आहे. परंतु उमेदवार लादण्याऐवजी जनतेतून ठरवला जावा असे मत त्यांनी मांडले़. गण आणि आरक्षण निहाय बैठका घेऊन संभाव्य उमेदवारांची नावे निश्चित करण्याच्या सुचना देताना इच्छुकांनी आपले स्वत:चे घोडे दामटण्यापेक्षा इतरांना संधी देणे अधिक संयुक्तिक ठरेल असा चिमटाही काढला़प्रारूप मतदार याद्या प्रसिध्द झाल्यानंतर कोणत्याही शेतक-यांचे नाव यादीतून वगळले जाणार नाही अथवा मतदानापासून कोणीही वंचित राहणार नाही याची काळजी घेण्याचे आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केले़ कार्यकर्त्यांच्या सुचनावर चर्चा करण्यात आली़