बाबासाहेब देशाचा, तर रमाई बाबासाहेबांच्या आधार होत्या – डॉ. श्रीपाल सबनीस

पुणे : संविधानाचे निर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे जीवन देशासाठी समर्पित होते. तर, रमामाईंनी आपले जीवन बाबासाहेबांना समर्पित केले होते. बाबासाहेब जर देशाचा आधार होते, तर रमाई बाबासाहेबांच्या आधार होत्या, हेच त्यांचे मोठेपण आहे. रमाई हे समतेचे, वैचारिकतेचे, भारताच्या एकात्मतेचे आणि स्त्रीच्या मांगल्याचे प्रतिक आहे, असे मत माजी साहित्य संमेलनाध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी व्यक्त केले.

महामाता रमाई भिमराव आंबेडकर स्मारक समितीतर्फे पाच दिवसीय महामाता रमाई महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवाचे उद्घाटन सामाजिक कार्यकर्ते डॉ. भाई वैद्य यांच्या हस्ते झाले. यावेळी डॉ. सबनीस म्हणाले, केवळ दलितांचे नव्हे तर मानवमुक्तीचा विचार बाबासाहेबांनी मांडला. त्या विचारांना रमाई यांनी पाठिंबा दिला. बाबासाहेबांचे माणूसपण, लोकांना समर्पित जीवन समजून घेताना रमाईंनी उभारलेला संसार ही एक महान बाब आहे. रमामाईंचे मोठेपण बाबासाहेबांना समजून घेण्यात आहे.भाई वैद्य म्हणाले, जाती विध्वंसाचा विचार बाबासाहेबांनी मांडला. संविधान क्रांती घडविली. त्यांचे आयुष्य हे प्रत्येक व्यक्तीसाठी आदर्श आहे. स्वत: उच्चशिक्षित असताना आपल्या अशिक्षित पत्नीला तुच्छ वागणूक न देता तिला नेहमीच आदराचे स्थान दिले. परिस्थिती बदलल्यानंतर स्वत:च्या पत्नीचा परित्याग करणाऱ्या पुरुषांनी बाबासाहेबांचा आदर्श घ्यावा. तसे घडले तर देशात अजून एक क्रांती झाल्याशिवाय राहणार नाही.

विश्वजित कदम म्हणाले, सध्या जे वातावरण देशात, राज्यात आहे ते दिशाभूल करणारे आहे. नुकतेच घडलेले भीमा-कोरेगाव प्रकरण लाज वाटावे असे आहे. अशा पार्श्वभूमीवर आयोजित या महोत्सवामुळे सध्याच्या परिस्थितीबाबत चर्चा घडेल.महोत्सवाचे स्वरूप अधिक व्यापक व्हावे आणि देशभरात या महोत्सवाची ख्याती पोहोचावी अशा शुभेच्छा देसरडा यांनी दिल्या. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन कवी उद्धव कानडे यांनी केले, तर वैशाली चांदणे यांनी आभार मानले.

You might also like
Comments
Loading...