‘श्रीपादचे छिंदम’चाळे सुरूच! टपरी चालकाला शिवीगाळ करत मारहाण; अॅट्रॉसिटी दाखल

shripad chindam

अहमदनगर : महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीत अपशब्द वापरणारा श्रीपाद छिंदम पुन्हा एकदा वादात सापडला आहे. या श्रीपादचे छिंदमचाळे काही थांबायचे नाव घेत नाहीत. अहमदनगर निवडणुकीवेळी त्यांने ईव्हीएमची पूजा केली होती. तर आता एका टपरी चालकाला जातीवाचक शिवीगाळ करुन तो पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, भागीरथ भानुदास बोडखे (५२, रा. वारुळाचा मारुती, नालेगाव) हे दिल्ली गेट येथील एका गाळ्यात काम करत होते. यावेळी छिंदम बंधू व अन्य ३० ते ४० लोक त्या ठिकाणी आले. बोडखे यांना ही जागा आम्ही विकत घेतली आहे आत्ताच्या आता चालता हो, तुझे सामान बाहेर काढ, अन्यथा तुला पाहून घेऊ, असे म्हणत दमबाजी केली. यावेळी बोडखे यांना शिवीगाळ करून जातीवाचक शब्द वापरले.

बोडखे यांनी फिर्यादीत म्हटले आहे की, संबंधित आरोपी दमदाटी व शिवीगाळ करत असताना फिर्यादीने मुलगा व अन्य घरच्या लोकांना बोलावून घेतले. त्यांनादेखील संबंधित आरोपींनी शिवीगाळ करत दमदाटी करण्यात आली. फिर्यादी बोडखे यांची पत्र्याची टपरी क्रेनने उचलून त्याजागी नवीन टपरी ठेवण्यात आली. याप्रकरणी बोडखे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार तोफखाना पोलिसांनी श्रीकांत शंकर छिंदम, श्रीपाद शंकर छिंदम, महेश सब्बन, राजेंद्र जमदाडे आणि राजेंद्र म्याना छिंदम यांच्यासह अन्य ४० लोकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अहमदनगरचा तत्कालीन उपमहापौर असलेल्या श्रीपाद छिंदम याने महापालिका कर्मचाऱ्याशी दूरध्वनीवरुन बोलताना शिवरायांबाबत अवमानजनक अपशब्द वापरले होते. तीन वर्षांपूर्वी घडलेल्या या घटनेचे राज्यभर तीव्र पडसाद उमटले होते. विशेष म्हणजे त्यानंतर श्रीपाद छिंदम अहमदनगर महापालिकेच्या निवडणुकीला पुन्हा उभा राहिला होता. अपक्ष उभ्या राहिलेल्या छिंदमचा निवडणुकीत त्याचा विजयही झाला. तर २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत बसपाच्या तिकीटावर रिंगणात उतरण्याची हिंमतही केली होती. परंतु सुज्ञ नागरिकांनी त्याला नाकारले.

महत्वाच्या बातम्या