‘राज ठाकरे पुरंदरेंच्या पायाशी नसते तर मनसेचे १३ वरुन ५० आमदार झाले असते…’

raj thackeray - kokate

पुणे : संभाजी ब्रिगेडचे प्रविण गायकवाड आणि मनसेमध्ये शाब्दिक कलह सुरु आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या 99 व्या वाढदिवसाच्या कार्यक्रमाला पुण्यात हजेरी लावली होती. तेव्हा राज ठाकरेंनी जाती व्यवस्थेवरुन अप्रत्यक्षपणे काही नेत्यांवर निशाणा साधला होता. त्यानंतर प्रविण गायकवाड यांनी फेसबुक पोस्टच्या माध्यमातून राज ठाकरेंवर टीकास्त्र सोडले होते.

राज ठाकरेंना जसे पुरंदरेंच्या पलीकडे इतिहासाचे आकलन नाही, तसेच त्यांना इथल्या राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक संघर्षाचेही आकलन नाही. राजकारणात कुठलेही नवनिर्माण करता न आलेला आणि राजकारणात सपशेल अपयशी ठरलेला हा माणूस आता स्वतःच्या राजकीय फायद्यासाठी महाराष्ट्रात पुन्हा एकदा हा सगळा संघर्ष उभा करण्याचा प्रयत्न करत दिसत आहे.त्यांना आपले आजोबा प्रबोधनकार ठाकरे यांच्या वारशाचा विसर पडला आहे, हे यानिमित्ताने स्पष्ट झाले आहे. त्यांची सध्याची जी काही मांडणी आहे, ती प्रबोधनकार ठाकरेंच्या ब्राह्मणेतर विचारांपासून फारकत घेणारी आणि पुरंदरेंच्या ब्राह्मणी वर्चस्वाच्या विचारणसरणीला जवळ करणारी आहे हे मात्र नक्की. असा टोला गायकवाड यांनी लगावला आहे.

त्यानंतर आता इतिहास अभ्यासक डॉ. श्रीमंत कोकाटे यांनी देखील राज ठाकरे यांच्यावर सडकून टीका केली आहे. ‘राज ठाकरे हे बाबासाहेब पुरंदरे यांच्या पायाशी आहेत; म्हणूनच त्यांची अधोगती झालेली आहे. बाबासाहेब पुरंदरे यांच्या पलीकडे शिवाजी महाराजांचा इतिहास राज ठाकरेंना माहिती नाही. बाबासाहेब पुरंदरे यांच्या इतिहासाचं समर्थन राज ठाकरे यांनी करु नये’, असा सल्ला कोकाटे यांनी दिला आहे. पुरंदरे यांच्या पायाशी राज नसते, तर मसनेचे आमदार १३ वरुन ५० वर गेले असते, असेही कोकाटे या वेळी म्हणाले.

दरम्यान, प्रविण गायकवाड यांनी राज ठाकरेंवर केलेल्या टीकेनंतर पुण्यातील मनसेने आक्रमक पवित्रा घेतला असल्याचे दिसत आहे. मनसेचे पुणे शहर अध्यक्ष व नगरसेवक वसंत मोरे यांनी, ‘2019 च्या लोकसभा निवडणुकीत पुण्यातून इच्छुक असणारा तू, मी स्वत: गल्लोगल्ली फिरताना तुला पाहिलंय. मी प्रविण गायकवाड, असे सांगत होतास. तुला राज ठाकरे काय कळणार? लायकीत राहायचं नाहीतर पुण्यात फिरणं मुश्किल करू,’ असा इशारा त्यांनी दिला आहे.

महत्वाच्या बातम्या