पुण्याच्या श्रीकांत इंगळहळीकर यांनी भातशेतीमध्ये ‘पॅडी आर्ट’च्या माध्यमातून साकारला पाचू-कवडा

इंगळहळीकरांच्या ‘पॅडी आर्ट’ या उपक्रमाचे हे सलग तिसरे वर्ष

पुणे : सह्याद्रीच्या द-याखो-यातील फुलांच्या संशोधनासाठी प्रसिद्ध असलेले पुण्यातील हौशी वनस्पतीशास्त्रज्ञ श्रीकांत इंगळहळीकर यांच्या प्रयत्नांतून सिंहगड रस्त्यावरील डोणजे फाटा येथे सलग तिस-या वर्षी ‘पॅडी आर्ट’ साकारले आहे. ‘पॅडी आर्ट’ अर्थात भातशेतीच्या माध्यमातून भव्य चित्र साकारण्याचे हे इंगळहळीकर यांचे सलग तिसरे वर्ष असून यावर्षी त्यांनी एमेराल्ड डव्ह अर्थात पाचू-कवडा हा विषुववृत्तीय सदाहरित जंगलात राहणारा पक्षी साकारला आहे.

व्यवसायाने उद्योजक असलेल्या इंगळहळीकर यांनी जपानमधील हे ‘पॅडी आर्ट’ प्रथमच पुण्यात आणले. मागील दोन वर्षी त्यांनी यातूनच साकारलेला गणपती व काळा बिबट्या पुणेकरांसाठी आकर्षण ठरला होता. ‘पॅडी आर्ट’ साकारताना जमिनीचा एका ‘कॅन्व्हास’सारखा वापर केला जातो आणि विविध रंगातील भाताची रोपे लावून रंगसंगती साधली जाते. जोराच्या पावसात गुडघाभर पाण्यात उभे राहून दोन रंगांच्या भातपिकाची पेरणी करणे हे आव्हानात्मक काम असल्याचे इंगळहळीकर यांनी नमूद केले. या वर्षी इंगळहळीकर यांनी ‘रांगोळी’ संकल्पनेमध्ये ‘पाचू-कवडा’ ही एका सुंदर दुर्मिळ पक्ष्याची ५० बाय ७० फूट आकाराची प्रतिमा सादर केली आहे.

पाचू-कवडा अर्थात एमेराल्ड डव्ह हा विषुववृत्तीय सदाहरित जंगलात राहणारा पक्षी असून त्याचा आढळ भारतापासून दक्षिण-पूर्व आशिया पर्यंत आहे. सह्याद्रीमध्ये माथेरान, भीमाशंकर, महाबळेश्वर, कोयना, आंबोली अशा सावलीच्या जंगलात पाचू-कवड्यांच्या जोड्या दिसतात. पडलेली फळे आणि वाहनांतून सांडलेले धान्य खायला हे पक्षी रस्त्यावर उतरतात आणि चाहूल लागताच वेगाने दाट जंगलात नाहीसेही होतात, अशी माहितीही यावेळी इंगळहळीकर यांनी दिली. पाचू-कवडा या पक्षाला तमिळनाडू सरकारने मानाचा राज्य-पक्षी असा दर्जा दिला असून जंगलांचे संरक्षण व संवर्धन केल्यास हा व यांसारखे अनेक दुर्मिळ पक्षी टिकून राहू शकतील त्यामुळे याकडे सरकार व नागरीकांनी लक्ष द्यावे असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. येत्या काही वर्षांत सह्याद्रीच्या जंगलातल्या दुर्मिळ प्राणी, पक्षी आणि इतर जीवांच्या प्रतिमा सादर करण्याचा विचार असल्याचेही ते यावेळी म्हणाले.

‘पॅडी आर्ट’ या कलेविषयी –

दक्षिण जपानमधील ओमोरी जिल्ह्यात असलेले इनाकादाते या गावात ‘पॅडी आर्ट’चा जन्म झाला. या भागात वर्षानुवर्षे भातशेती केली जाते. ही भातशेती कोणत्याही यंत्राच्या वापराविना केली जाते. काही वर्षांपूर्वी या भातशेतीला दोन हजार वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने तेथील शेतक-यांनी उत्सव साजरा करण्याचे ठरवले आणि त्यातून ‘पॅडी आर्ट’ अर्थात ‘टॅम्बो अटा’ ही कला १९९३ मध्ये जपानमध्ये लोकप्रिय झाली.

इनाकादाते या गावात होणा-या या उत्सवाची माहिती श्रीकांत इंगळहळीकर यांना इंटरनेटच्या माध्यमातून मिळाली आणि त्यापासून प्रेरित होऊन त्यांनी सिंहगड रस्त्यावरील डोणजे फाटा येथे असलेल्या आपल्या ‘लेक्सॉन विंडर्स’ या कंपनीच्या आवारात या ‘पॅडी आर्ट’पासून भव्य गणपती व काळा बिबट्या साकारला होता. इंगळहळीकर यांनी साकारलेले ‘पॅडी आर्ट’ उंचावरून आणखीनच खुलून दिसत असून त्यामुळे पुणे आणि परिसरातील पर्यटकांसाठी ते एक आकर्षण ठरते आहे. जवळजवळ डिसेंबर महिन्यापर्यंत हे पॅडी आर्ट पाहता येणार आहे.

You might also like
Comments
Loading...