‘नामांतर हे बाळासाहेबांच्या आत्म्याला तृप्त करण्यासाठी नाही तर शिवसेनेला स्वत:चा अजेंडा चालवण्यासाठीच’

shrihari ane

नागपूर : नागपूरस्थित गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणी संग्रहालयाचे नामकरण ‘बाळासाहेब ठाकरे गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणी उद्यान नागपूर’ असे करण्यात आले आहे. याबाबतचा शासन निर्णय नुकताच जारी करण्यात आला होता त्यानंतर त्याचे उद्घाटन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे. नागपूरजवळ गोरेवाडा येथे आंतरराष्ट्रीय प्राणी उद्यान साकारले असून त्या ठिकाणी जनतेला आंतरराष्ट्रीय दर्जाच्या पर्यटन सुविधा उपलब्ध करुन देण्याच्या अनुषंगाने प्रकल्प आराखडा बनविण्यात आला आहे. गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणी उद्यान हे व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र वनविकास महामंडळ, नागपूर यांच्या अखत्यारित असून तेथे आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सफारी व सुविधा उपलब्ध करुन देण्याची कार्यवाही सुरु आहे.

मात्र आता या प्राणी संग्रहालयाच्या नामांतरावरून चांगलच राजकारण तापले आहे. ज्येष्ठ विधीज्ञ आणि राज्याचे  माजी महाधिवक्ता श्रीहरी अणे यांनी या नामांतरावरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना चांगलाच टोला लगावला आहे. नागपुरातील गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणीसंग्रहालयाला बाळासाहेब ठाकरे यांचं नाव दिलं आहे. यामुळे बाळासाहेबांच्या आत्म्यालाही तृप्ती मिळणार नाही. विदर्भात शिवसेना आपले पाय रोवू शकत नाही, त्यामुळे हे नाव देण्यात आलं आहे, याचा काहीही फायदा शिवसेनेला होणार नाही” अशी टीका श्रीहरी अणे यांनी केली आहे.

गोंडवाना देण्याची मागणी नाही. गोंडवाना हे नावच आहे. गोरेवाडा हे नाव आहे. आपल्या विदर्भात गोंडाचं सहाशे वर्ष राज्य झालं. ही गोंडांची राजधानी होती एकेकाळची. गोंड हे इथले मूळचे होते. इंग्रजांच्या पूर्वीपासून गोंडवाना म्हटलं जायचं. याला ऐतिहासिक वारसा आहे. हे नाव बदलून तुम्ही बाळासाहेब ठाकरेंचं नाव देता. हे बाळासाहेबांच्या आत्म्याला तृप्त करण्यासाठी नाही तर शिवसेनेला स्वत:चा अजेंडा चालवण्यासाठी आहे. त्यांना या भूमीत पाय रोवता येत नाहीत, याची शिवसेनेला पूर्ण कल्पना आहे. मात्र लोकांच्या मनात नावं बदलून परिवर्तन होणार नाही. विदर्भवाद्यांचा आवाज हा दाबण्यात येणार हे नवीन नाही. हे अपेक्षित होतं”, असं श्रीहरी अणे म्हणाले.

महत्वाच्या बातम्या