भाजपला साथ देण्याचे कारण काय ? राष्ट्रवादीने धाडली नगरसेवकांना नोटीस

अहमदनगर :राज्यातील राजकीय जगताचे लक्ष लागून राहिलेल्या नगरच्या महापौर पदाची निवडणूक आज पार पडली. येधील महापौर पदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी पक्षाचे आदेश धुडकावून लावत अभद्र युती केली आणि भाजपचा महापौर निवडून आणला.राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नगरसेवकांंनी भाजपला साथ दिल्याने याचे पडसाद राज्यातील राजकारणावर उमटले आहेत. राष्ट्रवादीच्या प्रदेश नेतृत्वाने सावध भूमिका घेत याची दाखल घेतली आहे.

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी ट्वीट करून या संदर्भातील माहिती दिली.ते ट्वीट मध्ये म्हणाले की,अहमदनगरमध्ये काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोबत महानगरपालिकेची निवडणूक लढले होते, त्यामुळे राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी भाजपासोबत जाण्याचा निर्णय अत्यंत आक्षेपार्ह व अस्वीकारार्ह आहे. स्थानिक पातळीवरील नेत्यांनी घेतलेला हा निर्णय चुकीचा आहे.तसेच सर्व संबंधित नगरसेवकांना याबाबत कारणे दाखवा नोटिसा बजावण्याचे आदेश मी दिले आहेत. या नोटीसांना उत्तर आल्यानंतर संबंधितांवर कारवाईचा निर्णय घेतला जाईल असे पाटील यांनी म्हंटले आहे.

नगर महापालिकेत एकूण ६८ जागा असून विजयासाठी ३५ चे संख्याबळ आवश्यक होते. निवडणुकीत शिवसेना २४, राष्ट्रवादी १८, भाजप १४, काँग्रेस ५, बसपा ४, सपा १ व अपक्ष २ असे संख्याबळ होते. भाजपाकडून बाबासाहेब वाकळे, शिवसेनेचे बाळासाहेब बोराटे व राष्ट्रवादीचे संपत बारस्कर यांच्यात तिहेरी लढत होणार होती. परंतु, राष्ट्रवादी काँग्रेसने ऐनवेळी माघार घेतल्याने भाजपाचे बाबासाहेब वाकळे महापौरपदी विराजमान झाले.