‘गोकुळ’ मध्ये पाटील गटाची घौडदौड, तर महाडिक गटाने खातं उघडलं !

कोल्हापूर : गेल्या काही दिवसांपासून कोल्हापुरात गोकुळ दूधसंघाच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलंच तापलेलं पाहायला मिळत आहे. सध्याच्या स्थितीत निवडणूक घेण्यास सत्ताधारी गटाचा विरोध होता. मात्र, पालकमंत्री सतेज पाटील यांच्या गटाने मात्र निवडणूक व्हावी अशी मागणी उचलून धरली होती. हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयापर्यंत जाऊन पोहोचलं होतं.

दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने गोकुळ दूधसंघाच्या निवडणुकीवर शिक्कामोर्तब केला. न्यायालयाने सत्ताधारी गटाची याचिका फेटाळून लावली आणि अखेर २ मे रोजी निवडणूक पार पडली आहे. जिल्ह्यातील आर्थिक केंद्र असलेल्या या दूधसंघावर सत्ता मिळवण्यासाठी जिल्ह्यातील दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली असून मतमोजणीला सुरुवात झाली आहे.

निकाल लागण्यास आता सुरुवात झाली असून कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील यांच्या राजर्षी शाहू शेतकरी आघाडीची घौडदौड सुरु आहे. तर, सत्ताधारी महाडिक-पी एन पाटील यांच्या राजर्षी शाहू आघाडीने आपलं खातं उघडलं आहे. यामुळे महाडिक गटाला दिलासा मिळाला असून भाजपचे माजी आमदार अमल महाडिक यांच्या पत्नी आणि महिला प्रवर्गात सत्ताधारी गटाच्या उमेदवार शौमिका महाडिक या विजयी झाल्या आहेत.

‘गोकुळ’ वर कोणाचा झेंडा फडकणार याचं चित्र आज दिवसाखेर स्पष्ट होईल. दरम्यान, शौमिका महाडिक यांना पहिल्यांदाच उमेदवारी देण्यात आली होती. महाडिक कुटुंबातील उमेदवार विजयी झाल्याने उत्साह वाढला असून रविवारी या निवडणुकांसाठी चुरशीने 99.78 टक्के इतकं मतदान झालं आहे.

महत्वाच्या बातम्या