महिलांनी स्वसुरक्षेसाठी कायदा हाती घ्यावा की घरकोंबड्या सरकार प्रमाणे घरात बसून राहावे? रक्षा खडसे संतापल्या..

महिलांनी स्वसुरक्षेसाठी कायदा हाती घ्यावा की घरकोंबड्या सरकार प्रमाणे घरात बसून राहावे? रक्षा खडसे संतापल्या..

औरंगाबाद : बीड, साकीनाका, परभणी , डोंबिवलीसह राज्यात अनेक ठिकाणी बलात्कार आणि महिलांवरच्या अत्याचारांच्या घटना घडल्या. तरी राज्यातील निर्भयांचा आक्रोश सरकारच्या कानी पडलेला नाही . महिला सुरक्षेच्या विषयात आघाडी सरकारची बेफिकीरी आणि निष्क्रीयता चीड आणणारी आहे. आता महिलांनी स्वसुरक्षेसाठी स्वत:च कायदा हाती घ्यायचा की घरकोंबड्या सरकार प्रमाणे त्यांनीही घरातच बसून रहायचे ? असा संतप्त सवाल खा.रक्षा खडसे यांनी औरंगाबाद येथे आयोजित पत्रकार परिषदेत उपस्थित केला.

यावेळी बोलताना पुढे त्या म्हणाल्या, तत्कालीन गृहमंत्र्यांनी शक्ती कायद्याची घोषणा केली. मात्र अद्याप कायदा लागू झालेला नाही. महाविकास आघाडी सरकार आल्यानंतर त्यांनी तातडीने या कायद्याबाबत निर्णय घ्यायला हवा होता. मात्र अजून पर्यंत त्यांना जाग आलेली नाही. महिला आयोगाचे अध्यक्षपद गेले कित्येक दिवस रिक्त होते. भाजपने धक्का दिल्यानंतरच याबाबत सरकारला जाग आली. त्यानंतर अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली.

यावेळी ठाकरे सरकारवर टीका करताना रक्षा खडसे म्हणाल्या, या सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे सध्या राज्यामध्ये महिला सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनला आहे. त्याचप्रमाणे महाराष्ट्रात एफआयआर नोंदणीत पोलिस हलगर्जी करतात. त्याचबरोबर पीडितेचा जबाब नोंदवून घेण्यासाठी टाळाटाळ होत असल्याच्या अनेक तक्रारी पाहायला मिळत आहे. अशा पोलिसांवर सरकार कारवाई का करत नाही? असा सवाल यावेळी त्यांनी उपस्थित केला. या पत्रकार परिषेदेला भाजप प्रदेश उपाध्यक्ष बस्वराज मंगरूळे, महिला मोर्च प्रदेश सरचिटणीस सविता कुलकर्णी, महिला मोर्च प्रदेश उपाध्यक्ष माधुरी अदवंत आदींची उपस्थिती होती.

महत्त्वाच्या बातम्या