संचारबंदीतही तुळजापूरमध्ये सर्रासपणे दुकाने चालू!

उस्मानाबाद: जिल्ह्यातील तीर्थक्षेत्र असलेलं तुळजापूर येथे दिवसेंदिवस कोरोना संसर्ग वाढत आहे. या पार्श्वभुमीवर कडक निर्बंधांसह संचारबंदी देखील लावण्यात आली आहे. तसेच नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई देखील करण्यात येत आहे. मात्र तरीही काही नागरिक तसेच व्यापारी नियमाचं पालन करत नसल्याचं दिसत आहे. ज्या व्यापाऱ्यांनी दुकाने उघडी ठेवली आहेत अशांवर कडक कारवाई करत त्यांचे दुकाने सील करण्यात येत आहेत. एकीकडे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे तर दुसरीकडे सर्रासपणे दुकाने सुरु ठेवण्यात येत आहेत. याला चाप बसण्यासाठी कारवाई करण्याचा निर्णय येथील प्रशासनाने घेतला आहे.

तुळजापूर शहराच्या विविध भागांमध्ये दोन पथकांमार्फत सोमवारी विना मास्क फिरणाऱ्या व वेळेपेक्षा जास्त कालावधीसाठी दुकान उघडे ठेवणाऱ्यांवर कारवाई करून ४८०० रूपयांचा दंड वसुल केला. शहरातील जवाहर गल्ली येथील कृष्णा दुध डेअरी वेळेपेक्षा अधिक काळ उघडे ठेवल्याने दुकानाला सील ठोकण्यात आले. तसेच मुथूट फायनान्स कंपनीने सोशल डिस्टन्सिंगचे उल्लंघन केल्याने व विना मास्क खातेदारांना प्रवेश दिल्याने १ हजार रुपयांचा दंड ठोठवण्यात आला.

दरम्यान विना मास्क खरेदी विक्री करण्यात येत होती, अशा नागरिकांवर पोलिसांनी कारवाई केली आहे. शिवाय शहराच्या विविध भागांमध्ये विना मास्क फिरणाऱ्या ९ व्यक्तींकडून २०० रुपये प्रमाणे एकूण १८०० रुपयांचा दंड आकारला असून, यामुळे व्यापाऱ्यांसह नियमांचे उल्लंघन करणाऱ्या नागरिकांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. नियमांचे पालन करण्याचे आवाहन येथील प्रशासन वारंवार देत असूनही येथील नागरिक नियमाचे उल्लंघन करत असल्याने ही कारवाई करण्यात येत आहे.

महत्वाच्या बातम्या