दुकानांचे फलक मराठीत करा, मनसेने दिला इशारा

पुणे : सर्व सरकारी कार्यालयाचे कामकाज मराठीत करण्यात यावे, महाराष्ट्रातील सर्व आस्थापनांचे फलक मराठीत असावेत या महाराष्ट्र शासनाच्या अध्यादेशानुसार शहरातील सरकारी कार्यालये, महामंडळे, हॉटेल, दुकाने यांचे फलक मराठीत करा अन्यथा मनसे स्टाईलने आंदोलन करण्यात येईल असा इशारा मनसेचे पिंपरी- चिंचवड शहराध्यक्ष सचिन चिखले यांनी आज (मंगळवारी) पत्रकार परिषदेत दिला.

यापूर्वी बँकांचे कामकाज मराठीतून करावे अशी मागणी मनसेतर्फे करण्यात आली होती.पालिकेतील मनसेच्या कक्षात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. सचिन चिखले म्हणाले, सर्व सरकारी कार्यालयाचे कामकाज मराठीत करण्यात यावे, महाराष्ट्रातील सर्व आस्थापनांचे फलक मराठीत असावेत हा महाराष्ट्र शासनाचा अध्यादेश असतानाही अनेक दुकाने, हॉटेल, कार्यालये यांच्या पाट्या इंग्रजी भाषेतून लावण्यात आलेल्या आहेत. अनेक सरकारी कार्यालयातील कामकाज अद्याप मराठीमधून होत नाही.

त्यामुळे येत्या पंधरा दिवसात या अध्यादेशाचे पालन करून सर्व आस्थापनांच्या पाट्या मराठीतून लावाव्यात, सर्व सरकारी कार्यालयाचे कामकाज मराठीतून करण्यात यावे. अन्यथा मनसे स्टाईलने आंदोलन करण्यात येईल असा इशारा त्यांची दिला.चिखले पुढे म्हणाले की, मनसेतर्फे प्रत्येक व्यावसायिकाला मराठीमध्ये पाट्या लावण्याबाबत निवेदन देण्यात येणार असून सोबत शासनाच्या अध्यादेशाची प्रत देण्यात येणार आहे.

15 दिवसांच्या मुदतीनंतर ज्या व्यावसायिकांनी मराठीतून पाट्या लावल्या नाहीत अशा व्यावसायिकांच्या विरोधात शासनाच्या नियमाचे उल्लंघन केल्याप्रकरणी फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येईल आणि त्यानंतर मनसे स्टाईलने आंदोलन करण्यात येईल