अब्दुल सत्तारांच्या मतदारसंघात ‘शोले’, २८ तासानंतर ‘मौसीजी मान गयी’

औरंगाबाद : सिल्लोड शहरात पाण्याच्या टाकीवर सुरू असलेले शोले स्टाईल आंदोलन अखेर प्रशासनाकडून त्रिसदस्यीय समिती गठित झाल्यानंतर २८ तासानंतर मागे घेण्यात आले. त्यामुळे या नाट्यावर पडदा पडला आहे.

सिल्लोड नगर पालिकेवर शिवसेनेचे मंत्री अब्दुल सत्तार यांची सत्ता आहे. परंतू, पालिकेने गेल्या काही महिन्यांपासून सफाई कामगारांचे वेतन दिलेले नाही. वेतन मिळत नसल्याने कामगारांसमोर अडचण निर्माण झाली आहे. अनेकांवर उपासमारीची वेळ आली आहे. अनेकदा मागणी करून, आंदोलनाचा इशारा देऊनही पालिकेने वेतन दिले नाही. त्यामुळे संतप्त होऊन सफाई कामगार शहरातील मुख्य भागात असलेल्या पाण्याच्या टाकीवर चढले. यावेळी आंदोलकांनी सत्तारांच्या विरोधातही घोषणाबाजी केली. वेतन मिळेपर्यंत हे आंदोलन सुरूच राहिल असा इशारा दिला होता.

पाण्याच्या टाकीवर सलग दुसऱ्या दिवशीही शोले स्टाईल आंदोलन सुरु असल्याने सदर आंदोलनाचा पवित्रा पाहता उपविभागीय अधिकारी ब्रिजेश पाटील, उपविभागीय पोलिस अधिकारी विजयकुमार मराठे, नगर परिषद मुख्याधिकारी सय्यद रफीक यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन आंदोलनकर्त्यासी प्रत्यक्ष चर्चा केली. कामगारांच्या विविध मागण्या सोडवण्याचे लेखी आश्वासन दिल्याने अखेर आंदोलनकर्त्यांकडून आंदोलन मागे घेण्यात आले.

महत्वाच्या बातम्या