तनवाणींच्या अस्तित्त्वाला धक्का, गुलमंडीचा ‘बुरूज’ मनपाने ढासळला

औरंगाबाद:शहराचा आत्मा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुलमंडीमध्ये मागील २५ वर्षापासून शिवसेनेची सत्ता आहे. त्यातच गुलमंडी म्हणजे शिवसेनेचे माजी आमदार किशनचंद तनवाणी यांचा गड मानला जातो. गुलमंडी परिसरात तनवाणी यांच्या शिवाय पान ही हलत नाही असे म्हटले जायचे. परंतु याला महापालिका प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांच्या अतिक्रमण पथकाने खोडा घातल्याचे दिसत आहे. गुलमंडी येथील अतिक्रमणावर जेसीबी चालवून तनवाणी यांच्या गडाला तडा दिला आहे. या कारवाईमुळे किशनचंद तनवाणी यांचा गुलमंडीचा ‘बुरूज’ ढासळल्याची चर्चा सुरू आहे.

२०१४ साली तनवाणी यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र करत भाजपमध्ये प्रवेश केला होता. परंतु त्यानंतर भाजपालाही सोडचिठ्ठी देत ऐन निवडणुकीच्या तोंडावर फेब्रुवारी २०२० मध्ये पुन्हा शिवबंधन बांधले होते. मागील काही दिवसापासून तनवाणी यांनी शिवसेनेतील आपले स्थान परत मिळवणे शक्य झाले नसल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळेच सोमवारी झालेल्या मनपा पथक आणि तनवाणी यांच्या झटापटीत शिवसेनेच्या नेत्यांनी पाठ फिरवली असल्याची गुलमंडी परिसरात जोरदार चर्चा सुरु आहे.

माजी आमदार किशनचंद तनवाणी यांचा गुलमंडी परिसरावर मोठया प्रमाणात वचक आहे. यामुळेच याठिकाणी असलेले अतिक्रमण मागील अनेक वर्षापासून महानगर पालिका काढू शकली नाही. विनामास्क कारवाई करताना सोमवारी गुलमंडी चौकात महापालिकेच्या नागरिक मित्र पथकाला माजी आमदार किशनचंद तनवाणी, भाजपचे पदाधिकारी सुरेंद्र कुलकर्णी आणि अतिष जोजारे यांनी कारवाईला विरोध करत मारहाण केल्याचा प्रकार घडला होता. त्यामुळे विरोध करणाऱ्याविरोधात विविध कलमाखाली गुन्हा नोंदवण्यात आला. त्यामुळे या प्रकारानंतर गुलमंडीवरील व्यापाऱ्यांनी क्रांती चौक पोलीस ठाण्यात धाव घेत पथक मुजोरी करून पैसे वसूल करत असल्याचे सांगत तक्रार दिली होती. त्यामुळेच महापालिकेने गुलमंडी भागात अतिक्रमनावर कारवाई करून वचपा काढल्याची चर्चा शहरात सुरू होती.

महत्वाच्या बातम्या