धक्कादायक! खा.प्रिन्स राज पासवान विरोधात बलात्काराचा गुन्हा; चिराग पासवान यांचेही नाव

नवी दिल्ली : बिहारच्या समस्तीपूरमधील लोक जनशक्ती पक्षाचे खासदार प्रिन्स राज पासवान यांच्याविरोधात दिल्लीमध्ये बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. धक्कादायक बाब म्हणजे यामध्ये चिराग पासवान यांचेही नाव समोर आले आहे. प्रिन्स हे चिराग पासवान यांचे चुलत भाऊ आणि केंद्रीय मंत्री पशुपती पारस पासवान यांचे पुतणे आहेत. यामुळे बिहारच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.

तीन महिन्यांपूर्वी एका युवतीने दिलेल्या तक्रारीवरून दिल्ली पोलिसांनी अखेर खासदार प्रिन्स राज यांच्याविरोधात कॅनॉट प्लेस पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. संशयित आरोपी आणि चुलत भाऊ प्रिन्स राज पासवान यांच्याविरोधात कारवाईला उशीर केल्याचा आणि कट रचल्याचा आरोप चिराग पासवान यांच्यावर ठेवण्यात आला आहे.

याबाबत पीडितेची वकील सुदेश कुमारी जेठवा यांनी सांगितले की, ‘आम्ही मे महिन्यात दिल्ली पोलिसांत बलात्काराची तक्रार दाखल केली होती. त्यानंतर जुलै महिन्यात दिल्ली न्यायालयात याबाबत अर्ज करण्यात आला होता. यानंतर दिल्ली न्यायालयानं खासदार प्रिन्स राज आणि त्यांचा चुलत भाऊ चिराग पासवान यांच्याविरोधात एफआयआर नोंदवण्याचे निर्देश पोलिसांना दिले होते. दरम्यान, १० फेब्रुवारी रोजी प्रिन्स राज यांनी फिर्यादी तरुणीच्या विरोधात खंडणीचा गुन्हा दाखल केला होता.

पीडितेने प्रिन्स राज यांच्यावर तिचा अश्लिल व्हिडीओही बनविल्याचा आरोप केला आहे. बलात्कारानंतर वाच्यता केल्यास व्हिडीओ व्हायरल करण्याची देखील धमकी देण्यात आली होती. तसेच या प्रकरणी पोलिसांत न जाण्यासाठी धमकविण्यात आले होते, दबाव टाकण्यात आला होता. या घटनेनंतर पीडित तरुणीनं लोक जनशक्ती पार्टीतून राजीनामा दिला होता. त्यानंतरही संशयित आरोपी प्रिन्स राज पीडितेसोबत शारीरिक संबंध ठेवण्यासाठी अनेकदा रात्री-अपरात्री घरी यायचा, असंही पीडितेनं तक्रारीत म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या