कोल्हापुरात जात पंचायतीची धक्कादायक घटना, प्रेमविवाह तोडण्यासाठी तरुणीला…

kolhapur

कोल्हापूर : महाराष्ट्राला पुरोगामी दूरदृष्टी असलेल्या विचारवंतांचा आणि नेत्यांचा फार मोठा वारसा लाभला आहे. स्वातंत्र्यापूर्व काळ असो वा स्वातंत्र्य मिळाल्यानंतर, महाराष्ट्रात समाजातील अनिष्ठ रूढी, परंपरा तसेच महिला सबलीकरण यासाठी अनेक चळवळी राबवल्या गेल्या. मात्र, पुरोगामित्वाचा साक्षीदार असलेल्या महाराष्ट्रात एक धक्कादायक घटना घडली आहे.

जातपंचायतींमुळे अनेक नागरिकांना आज देखील अन्याय व क्रूर पद्धतींना सामोरे जावे लागत असल्याचं अनेकदा समोर आलं आहे. महिलांवर त्यांच्या चारित्र्यसंपन्नतेची परीक्षा द्यावी लागते. याबाबत अनेक प्रकार तुम्ही वाचले असतील वा कानावर पडले असतील. जात पंचायतीच्या अघोरी आणि अन्यायी न्यायनिवाड्याच्या विरोधात अनेक चळवळी झाल्यानंतर कायद्यांनी देखील गंभीर गुन्ह्याची तरतूद केली. मात्र, अजूनही असे प्रकार घडत असल्याचे समोर येत आहे.

आता, राजर्षि शाहू महाराजांच्या पुरोगामित्वाचा वारसा असलेल्या कोल्हापूर जिल्ह्यात जातपंचायत संदर्भातिल धक्कादायक घटना समोर येत आहे. ‘एका प्रेम विवाह केलेल्या जोडीचा वाद घटस्फोटापर्यंत पोहोचला. संतापजनक म्हणजे या खटल्यात निवाडा करण्यासाठी चक्क कोल्हापूर शहरात जात पंचायत भरली. कोल्हापुरातील न्यायसंकुलापासून काही मीटर अंतरावर बसलेल्या या पंचायतीत मुलगीवर दबाव आणून घटस्फोट घेण्याची सल्लावजा धमकी देण्यात आली.

एका झाडाखाली कंझारभाट समाजाची पंचायत बसली. याठिकाणी पुण्यातील मुलगी आणि कोल्हापूर मधील मुलाने केलेल्या प्रेमविवाहाचा घटस्फोट करुन देण्याचे काम सुरू होते. सुमारे वर्षभरापूर्वी या दोघांनी विवाह केला होता. पण वारंवार छळ सुरू झाल्याने मुलगी माहेरी निघून गेली. सध्या मुलाच्या घरच्यांकडून मुलीकडे सोडचिठ्ठी देण्याची मागणी केली जात होती. मुलीची इच्छा नसतानाही तिच्यावर दबाव आणून तिला घटस्फोट देण्याचा आग्रह जात पंचायत करत होती.

ठरल्याप्रमाणे साडेतीन लाख रुपये व्यवहार पूर्ण करून घटस्फोट दे, असं सांगितले जात होतं. पंचायत म्हणत होती आम्ही पंच आहोत कोणी ऐरेगैरे नथ्थुखैरे नाही. आम्ही सांगतोय त्यानुसार घटस्फोट दे… पण मुलीने जे काय बोलायचे असेल ते मी कोर्टात बोलीन असे ठणकावून सांगितलं आहे. हा सर्व प्रकार धक्कादायक व कायद्याच्या विरोधातील असून अजूनही अनेक समाजामध्ये जात पंचायतींना महत्व दिलं जात हे पुरोगामी महाराष्ट्रासाठी शरमेची गोष्ट आहे.

दरम्यान, याबाबत अजूनही कोल्हापुरातील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला नसून मुलीला विश्वासात घेऊन तक्रार जात पंचायती विरोधात तक्रार दाखल करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याची माहिती एका वृत्तसंस्थेने दिली आहे.

महत्त्वाच्या बातम्या