धक्कादायक! कोरोना बाधित शेतकऱ्याची गळफास घेवून आत्महत्या

उस्मानाबाद: जिल्ह्यात कोरोनाचा पादुर्भाव वाढत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. या भीतीमुळे उस्मानाबादेत एक दुर्दैवी घटना घडली आहे. कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आलेल्या शेतकऱ्याने गळफास घेवून आत्महत्या केली. ही घटना उमरगा तालुक्यातील बोरी शिवारात मंगळवारी सकाळी निदर्शनास आली. दरम्यान कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर हा शेतकरी स्वत:च्या शेतात रहात होता.

बोरी येथील एक ४८ वर्षीय शेतकरी सर्दी, खोकल्याच्या त्रासाने त्रस्त होता. त्यामुळे तो ३ एप्रिल रोजी उमरगा येथील एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाला होता. लक्षणे पाहुन डॉक्टरानी त्याला कोरोना चाचणी करण्याची सूचना दिली. त्याची रॅपिड तपासणी करण्यात आली. त्यात तो पॉझिटिव्ह आढळून आला. त्यामुळे त्याला उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. दरम्यान त्याने होम आयसुलेशनची मागणी केल्याने प्रशासनाच्या चौकशीनंतर त्या व्यक्तीला सोमवारी रुग्णालयातून घरी पाठविण्यात आले.

त्याने २५ कि.मी. चा रस्ता पायी चालत जाऊन स्वत:चे शेत गाठले. शेतातील स्वतंत्र शेडमध्ये त्याने आपल्या कुटुंबातील सर्वांना बोलावून घेऊन याची माहिती दिली. सायंकाळी त्याने कुटुंबीयांशी ३० ते ४० फुट अंतरावरुन संवाद साधला. शेतकऱ्याचा भाऊ व मुलांनी सुरक्षितरित्या लांबूनच त्यांच्या जेवणाची व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली. सोमवारी रात्री साडेदहाच्या सुमारास त्या शेतकऱ्याने मी पॉझिटिव्ह असल्याने तुम्ही येथे थांबू नका, आराम करतो असे सांगून नातेवाईकाला घराकडे पाठविले. त्यानंतर रात्रीच्या सुमारास शेडच्या बाजुला असलेल्या झाडाच्या खाली स्टुल ठेवून त्या शेतकऱ्याने दोरीने गळफास घेतला. मंगळवारी सकाळी हा प्रकार नातेवाईकांना दिसून आला.

महत्वाच्या बातम्या