धक्कादायक! काश्मीरमध्ये कार्यरत असलेल्या जवानाची हिंगोलीत आत्महत्या

हिंगोली । तालुक्यातील पिंपळखुटा येथे केंद्रीय राखीव दलाच्या जवानाने शेतात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सोमवारी दुपारी १ वाजता घडली आहे. संजय योगाजी खंदारे (२८) असे आत्महत्या केलेल्या जवानाचे नाव आहे.

हिंगोली तालुक्यातील पिंपळखुटा येथील संजय योगाजी खंदारे चार वर्षापुर्वी केंद्रीय राखीव दलामध्ये रुजू झाले होते. ते सद्या जम्मू काश्मीर शेजारच्या कुपवाडा येथे कर्तव्यावर होते. सात दिवसांपुर्वीच ते आपल्या गावी एका महिन्याच्या सुट्टीवर आले होते. सोमवारी सकाळी घरून शेतात गेले. त्यानंतर संजय यांनी शेतामध्ये जेवण केले. दुपारी एक वाजता दुसऱ्या बाजूला असलेल्या शेतामधील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. शेजारी असलेल्या शेतात नांगरणीचे काम सुरु होते. त्या ठिकाणी असलेले काही शेतकरी विहीरीवर पाणी पिण्यासाठी आले होते.

त्यांना संजय खंदारे यांचा मृतदेह झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसला. या घटनेची माहिती कळताच ग्रामस्थांनी  घटनास्थळाकडे धाव घेतली. या घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलिस अधिक्षक यतीश देशमुख, बासंबा पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक मगन पवार, जमादार प्रवीण राठोड यांनी घटनास्थळी भेट दिली. या प्रकरणी बासंबा पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. संजय खंदारे यांच्या पश्चात आई, वडील, भाऊ असा परिवार आहे.

महत्त्वाच्या बातम्या