मायावतींना धक्का! बसपाच्या ९ बंडखोर आमदारांनी घेतली अखिलेश यादव यांची भेट

लखनऊ : उत्तर प्रदेशमध्ये सध्या राजकीय घडामोडींना वेग आल्याचे दिसत आहे. बहुजन समाज पार्टीच्या ९ बंडखोर आमदारांनी आज समाजवादी पार्टीचे प्रमुख अखिलेश यादव यांची भेट घेतली आहे. यामुळे राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापल्याचं दिसत आहे. बसपाचे हे सर्व आमदार आज सकाळी ११ वाजता थेट लखनऊ येथील समाजवादी पार्टीच्या मुख्यालयात पोहचले आणि त्यांनी अखिलेश यादव यांच्याशी प्रदीर्घ चर्चा केली. हा मायावतींना मोठा धक्का मानला जातोय.

पुढील वर्षी मार्च महिन्यात उत्तर प्रदेशातील विधानसभा निवडणुका संभावित आहेत. मागच्या विधानसभेवेळी बसपा आणि सपाने एकत्र निवडणूक लढवली होती. पण, आता दोन्ही पक्षांमध्ये वाद निर्माण झाला आहे. दोन्ही पक्षांच्या युतीला निवडणुकीत यश मिळालं नाही. तेव्हापासून अनेक आमदारांमध्ये अस्वस्थता होती. आता निवडणुकीला 8-9 महिने राहिले असताना बसपाच्या आमदारांनी बंडखोरी केली आहे. बंडखोर आमदार समाजवादी पार्टीमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे.

या आमदारांनी घेतली भेट

अखिलेश यादव यांची आज भेट घेणाऱ्या बसपाच्या ९ बंडखोर आमदारांमध्ये असलम राइनी (भिनगा-श्रावस्ती), असलम अली चौधरी (ढोलाना-हापुड़), मुज़्तबा सिद्दीकी (प्रतापपुर-इलाहाबाद), हाकिम लाल बिंद (हांडिया-प्रयागराज), हरगोविंद भार्गव (सिधौली-सीतापुर), सुषमा पटेल (मुंगरा बादशाहपुर), वंदना सिंह (सगड़ी-आज़मगढ़), रामवीर उपाध्याय (सादाबाद) व अनिल सिंह (उन्नाव) यांचा समावेश आहे.

उत्तर प्रदेशातील राजकारणात मोठी उलथापालथ

निवडणुकीच्या पार्श्वभूमीर उत्तर प्रदेशात अनेक घडामोडी पाहायला मिळणार आहे. काही दिवसांपूर्वी जितीन प्रसाद यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये प्रवेश केला होता. आता बसपा आमदारांच्या बंडखोरीने राजकीय वातावरण तापत असल्याचं स्पष्ट दिसत आहे. बहुजन समाज पक्षाच्या प्रमुख मायावती यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जातोय. दरम्यान, येत्या काळात उत्तर प्रदेशातील राजकारणात मोठी उलथापालथ पाहायला मिळण्याची शक्यता आहे.

महत्त्वाच्या बातम्या

IMP