अरबी समुद्रातील प्रस्तावित शिवस्मारक जगातील सर्वात उंच स्मारक ठरणार

shivsmarak

टीम महाराष्ट्र देशा – शिवस्मारकाच्या उंचीबाबत राज्य सरकारने दिलेल्या प्रस्तावाला केंद्रीय पर्यावरण खात्याने सोमवारी हिरवा कंदील दाखवल्यामुळे मुंबईतील अरबी समुद्रातील प्रस्तावित शिवस्मारक जगातील सर्वात उंच स्मारक ठरणार आहे. आता शिवस्मारकाची उंची १९२ मीटरऐवजी २१० मीटरपर्यंत वाढवण्यात येणार आहे.गिरगाव चौपाटीपासून समुद्रात सुमारे साडेतीन किलोमीटर अंतरावरील १५.८६ हेक्टर जागेवर स्मारक उभे केले जाणार आहे. या स्मारकासाठी पहिल्या टप्प्यात सुमारे २३०० कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.

सध्या चीनमधील लुशान कौंटी येथील स्प्रिंग टेम्पलमधील बुद्धाचा पुतळा हा जगातील सर्वात उंच पुतळा आहे. २००८ मध्ये या पुतळ्याचे काम पूर्ण करण्यात आले असून या पुतळ्याची उंची २०८ मीटर इतकी आहे. सुरुवातीला अरबी समुद्रातील प्रस्तावित शिवस्मारकाची उंची १९२ मीटर होती. मात्र, हा पुतळा जगातील सर्वात उंच पुतळा ठरावा यासाठी ही उंची २१० मीटर इतकी करण्यात यावी, अशी शिवप्रेमींची भावना असल्याचे शिवस्मारक समितीचे अध्यक्ष विनायक मेटे यांनी म्हटले होते. यानंतर राज्य सरकारने केंद्र सरकारच्या पर्यावरण खात्याकडे प्रस्तावदेखील सादर केला होता. या प्रस्तावाला केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने सोमवारी मंजुरी दिल्याचे वृत्त ‘हिंदुस्तान टाईम्स’ या दैनिकाने दिले आहे. शिवस्मारकाच्या कामाला जानेवारी २०१८ मध्ये सुरुवात होण्याची शक्यता असून २०२१ पर्यंत स्मारकाचे काम पूर्ण होईल, असे या वृत्तात म्हटले आहे.शिवस्मारकाच्या दुसऱ्या टप्प्यात हेलिपॅड, आयमॅक्स थिएटरचे काम केले जाणार आहे.