छत्रपती शिवाजी महाराज स्मारक भूमिपूजन व जलपूजन समारंभाला नागरिकांनी संख्येने उपस्थित रहावे

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराजांच्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या स्मारकाचा भूमिपूजन-जलपूजन समारंभांचा मुख्य कार्यक्रम, मेट्रो मार्ग 2, मेट्रो मार्ग 4, कुर्ला-वाकोला उन्नत मार्ग आणि मुंबई पारबंदर प्रकल्प या विविध प्रकल्पांचा शुभारंभ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते येत्या 24 डिसेंबर रोजी दुपारी 3 वाजता बांद्रा-कुर्ला संकुल येथे होणार आहे. या समारंभास नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील आणि शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत केले. यावेळी स्मारक समितीचे अध्यक्ष तथा आमदार विनायक मेटे हे उपस्थित होते.

छत्रपती शिवाजी महाराजांचे मुंबईमध्ये जागतिक किर्तीचे भव्य स्मारक व्हावे ही तमाम जनतेची इच्छा होती. त्यानुसार छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्य स्मारक अरबी समुद्रात उभारण्याचे निश्चित केले आहे. या स्मारकाच्या उभारणीसाठी लागणाऱ्या सर्व परवानग्या शासनाने घेतल्या असून या स्मारकाचा प्रकल्प अहवाल तयार करण्यात आला आहे. तसेच स्मारकाच्या कामाचे टेंडर काढण्यात आले असून भूमिपूजन समारंभानंतर लगेचच कामास सुरुवात करण्यात येणार आहे. स्मारकाच्या पहिल्या टप्प्याचे काम 2019 पर्यंत करण्यात येणार असल्याचेही श्री. पाटील यांनी सांगितले.

स्मारकाच्या भूमिपूजन-जलपूजन समारंभाच्या दिवशी अर्थात 24 डिसेंबरला मुख्यमंत्री श्री. फडणवीस हे कलश गिरगाव चौपाटी येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे सुपुर्द करणार आहेत. याठिकाणी भव्य समारंभ आयोजित करण्यात आला असून गिरगाव चौपाटी सजविण्यात येणार आहे. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विविध मान्यवरांसह हावरक्राफ्टने हे कलश घेऊन अरबी समुद्रातील स्मारकाच्या नियोजित स्थळी जाऊन भूमिपूजन-जलपूजन करणार आहेत.

राज्यपाल सी. विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, खासदार उदयनराजे भोसले, खासदार संभाजी राजे भोसले, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यावेळी उपस्थित असतील. यानिमित्त गिरगाव चौपाटी ते स्मारकस्थळ या मार्गावर शिवकालीन आरमाराचे चित्र उभे केले जाणार आहे. यानिमित्त गिरगाव चौपाटी ते बीकेसी या मार्गावर सी-लिंक, कलानगर चौक आदी स्थळे सजविण्यात येणार आहेत. तसेच शिवराज्याभिषेक सोहळ्याप्रसंगी सादर करण्यात आलेल्या विविध कला सादर करण्यात येणार असल्याची माहिती मंत्री श्री. तावडे यांनी दिली.

महाराष्ट्राचा मानबिंदू असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या या आंतरराष्ट्रीय स्मारकाच्या भूमिपूजन-जलपूजन समारंभास नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन मंत्री श्री. पाटील, श्री. तावडे यांनी यावेळी केले.

  • छत्रपती शिवाजी महाराजांचे मुंबईत जागतिक किर्तीचे स्मारक व्हावे ही जनतेची इच्छा
  • स्मारकासाठीच्या सर्व परवानग्या प्राप्त
  • 24 डिसेंबर रोजी स्मारकाचे पंतप्रधानांच्या हस्ते जलपूजन व भूमिपूजन
  • सर्व जिल्ह्यांचे कलश शिवाजी चौक, चेंबूर येथे जमा करण्यात येणार
  • कलश ठेवण्यासाठी भव्य रथ
  • गेट वे ऑफ इंडिया येथे सर्व कलश मुख्यमंत्र्यांकडे सुपुर्द करणार
  • मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे कलश गिरगाव चौपाटी येथे पंतप्रधानांच्या स्वाधीन करणार
  • मान्यवरांच्या हस्ते कलशातील माती व पाणी नियोजित स्मारकाच्या ठिकाणी टाकून भूमिपूजन व जलपूजन करणार
  • बीकेसी येथे जाहीर सभा व विविध उपक्रमांचे भूमिपूजन