शिवस्मारक: जल-माती कलशाची भव्य शोभायात्रा

मुंबई :  महाराष्ट्राचं आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या जागतिक किर्तीच्या स्मारकासाठी मुंबईनगरी सजली आहे. राज्यातल्या सर्व जिल्ह्यांमधून आलेल्या नद्यांचं जल आणि मातीच्या कलशांची आज चेंबूरमधून भव्य शोभायात्रा काढण्यात येत आहे.

दुपारी 3 वाजताच्या सुमारास अरबी समुद्रातल्या स्मारकासाठीच्या नियोजीत जागेवर शिवस्मारकाची मुहूर्तमेढ रोवली जाईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा पार पडणार आहे.

कोणत्या जिल्ह्यातून काय आणलं?

शिवस्मारकासाठी जळगावमधील भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी तापी, पूर्णा, गिरणा, पांझरा आणि बोरी नद्यांचं पाणी संकलित केलं, तर संत मुक्ताई, चांगदेव, सखाराम महाराज आणि असीरगडमधली माती एकत्र केली.

कोल्हापुरातल्या पन्हाळा, विशाळगड, सामानगड, भुदरगड, रांगणा अशा किल्ल्यांवरची माती, आणि पंचगंगा आणि कृष्णेच्या संगमाचं जल संकलित करण्यात आलं आहे.

नांदेडमधल्या साडेतीन शक्तीपीठांपैकी एक पूर्णपीठ असलेल्या माहूर गडावरची माती भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी संकलित केली.

अहमदनगरमध्ये मुळा, प्रवरा आणि सीना नदीचं पाणी, तर प्रेमगिरी किल्ली, विश्रामगड, भुईकोट किल्ला, हरिश्चंद्रगड, रतनगड आणि खर्डा किल्ल्यातली माती संकलित करण्यात आली.

कसा आहे मेगा प्लॅन

राज्यातून आलेली माती आणि पाणी यांचा कलश फ्लोटवर ठेवण्यात येईल. या फ्लोटसोबत सकाळी चेंबूरमधील शिवाजी महाराजांच्या मूर्तीपासून शोभायात्रेची सुरुवात होणार.

फ्लोट आणि शोभायात्रा सायन, लालबाग, गिरगाव चौपाटी असा प्रवास करत गेट वे ऑफ इंडियाला पोहोचणार. त्यानंतर गेट वे ऑफ इंडियावर उभारलेल्या भव्य स्टेजवर हा कलश, माती आणि पाणी सोपवलं जाईल. हेच पाणी आणि माती मुख्यमंत्री 24 डिसेंबरला पंतप्रधानांना देणार आहेत. त्यानंतर पंतप्रधानांच्या हस्ते शिवस्मारकाचं भूमीपूजन होणार आहे.

शिवस्मारकाच्या भूमीपूजनासाठी शिवकालीन वातावरण निर्मिती करण्यासाठी सरकारने नितीन देसाईंकडून मेघडंबरी किल्ल्याचा देखावा साकारला आहे.

दरम्यान भव्य रॅली आणि कार्यक्रम मुंबईत असले तरी संपूर्ण महाराष्ट्र यानिमित्ताने शिवमय होणार आहे. कारण प्रत्येक जिल्ह्यात जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने कार्यक्रमाचे फ्लेक्स वाटप चालू असून अनेक ठिकाणी हे फ्लेक्स झळकणार आहेत.

अरबी समुद्रात भूमीपूजनासाठी फक्त हे सहा जण उतरणार!

अरबी समुद्रात शिवस्मारकाच्या भूमीपूजन सोहळ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह फक्त सहा जण जाणार आहेत. भूमीपूजन आणि जलपूजनाला समुद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्यपाल सी विद्यासागर राव, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, खासदार उदयनराजे भोसले, खासदार संभाजीराजे छत्रपती जाणार आहेत.

कसं असेल समुद्रातील शिवस्मारक?

अरबी समुद्राच्या मध्यभागी असलेल्या भल्यामोठ्या खडकावर शिवस्मारक उभारण्याचा राज्य सरकारचा मानस आहे. यासाठी आवश्यक त्या सर्व परवानग्या केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने दिलेल्या आहेत.

शिवाजी महाराजांच्या कार्याची माहिती आंतरराष्ट्रीय स्तरावर व्हावी, यादृष्टीने भव्य स्मारक उभारण्यात येणार आहे. अमेरिकेतील स्टॅच्यू ऑफ लिबर्टीच्या धर्तीवर अरबी समुद्रात शिवाजी महाराजांचा अश्वारुढ पुतळा उभा करण्यात येणार आहे.

त्या दृष्टीने सरकारच्या हलचाली सुरु झाल्या आहेत. सरकारने विनायक मेटेंच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली आहे.

16 एकर जमीन

शिवस्मारकासाठी मुंबईतील मरीन ड्राईव्हजवळ अरबी समुद्रात 16 एकर जमीन निवडली आहे. हे स्मारक सुमारे 309 फूट उंच असेल. समुद्रात तीन एकर क्षेत्रावर भर घालून चबुतरा उभारण्यात येणार आहे. त्या परिसरात येणाऱ्या पर्यटकांना शिवाजी महाराजांबाबतची माहिती देणारी दालने, पुस्तक प्रदर्शन, चित्रफीत दाखविण्यासाठी दालन, वस्तुसंग्रहालय आणि उद्यान असा आराखडा आहे.

स्मारकाची जागा राजभवनपासून दक्षिण-पश्चिम बाजूस 1.2 कि.मी अंतरावर, गिरगाव चौपाटीवरील एच.टु. ओ जेट्टीपासून दक्षिण-पश्चिम दिशेने 3.60 कि.मी अंतरावर आणि नरिमन पाँईटपासून पश्चिमेस 2.60 कि.मी अंतरावर आहे.

स्मारकासाठी 15.96 हेक्टर आकारमानाचा खडक निवडण्यात आला आहे. याचे क्षेत्रफळ अंदाजे 650 मी द325 मी. एवढे आहे. सभोवताली 17.67 हेक्टर जागा उथळ खडकाची आहे.