fbpx

अक्षय आढळराव पाटलांनी वाढविला जनसंपर्क, विधानसभेची आंबेगाव-शिरूरमधून मोर्चेबांधणी?

टीम महाराष्ट्र देशा- शिरूर तालुक्यातील कान्हूर मेसाई येथे सुरू असलेल्या चारा छावणीला शिरूर लोकसभा मतदार संघाचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेनेचे युवानेते अक्षय आढळराव पाटील यांनी नुकतीच भेट दिली. शिरुर लोकसभा मतदारसंघात झालेल्या पराभवाकडे माजी खासदार शिवाजीराव आढळराव कसे पाहतात याची उत्सुकता संपूर्ण मतदारसंघाला लागून राहिली असताना त्यांचे चिरंजीव अक्षय आढळराव-पाटील यांनी जनसंपर्क वाढवायला सुरवात केली आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणूक अक्षय आढळराव लढणार का असा सवाल उपस्थित होऊ लागला आहे.

अक्षय यांनी छावणीत जनावरे दाखल केलेल्या शेतकऱ्यांशी संवाद साधला. तसेच यावेळी त्यांनी खर्चातून प्रतिदिन २ टन चारा देण्याचे देखील मान्य केले आहे. कान्हूर मेसाई येथे सुरू असलेल्या चारा छावणीस राज्य शासनाच्या वतीने प्रति जनावर १८ किलो चारा उपलब्ध करून देण्यात येत आहे. सदर चारा मोठ्या जनावरांना अपुरा पडत असल्याची माहिती शेतकऱ्यांनी अक्षय आढळराव पाटील यांना देताच त्यांनी आपल्या स्वखर्चातून प्रतिदिन २ टन चारा येथील चारा छावणीस देणार असल्याचे सांगितले. त्यांच्या या निर्णयावर परिसरातील शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले.

आपल्या पराभवाचा वचपा काढण्यासाठी दिलीप वळसे पाटलांनाच घेरण्याची संधी माजी खासदार आढळरावांना या निवडणुकीत मिळणार आहे. अक्षय यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरविण्याचे आडाखे आखले जात असल्याचे त्यांच्या वाढत्या संपर्क दौ-यामुळे दिसून येत आहे.