रिफायनरी प्रकल्पाविरोधात शिवसेनेचं मुसळधार आंदोलन

मुंबई: नाणार येथे होणाऱ्या रिफायनरी प्रकल्पाविरोधात शिवसेनेचं मुसळधार आंदोलन सुरु आहे. आज कोसळणाऱ्या मुसळधार पावसासोबतच शिवसेनेने तालुक्यातील डोंगर तिठा येथून संघर्ष यात्रेला सुरूवात केलीय. या संघर्ष यात्रेचे नेतृत्व खासदार विनायक राऊत यांनी केलं आहे. ‘रिफायनरी हटाव’, ‘रद्द करा रद्द करा रिफायनरी रद्द करा’,‘भाजपा हटाव, कोकण बचाव’, अशा घोषणा यावेळी दिल्या.नाणार येथे होणाऱ्या रिफायनरीबाबत भाजपाने सकारात्मक पाऊल टाकले आहे.

या प्रकल्पाला परिसरातील ग्रामस्थांनी कडाडून विरोध केला आहे. ग्रामस्थांच्या विरोधामुळे भाजपाव्यतिरिक्त इतर सर्वपक्षांनी रिफायनरी विरोधात आज आवाज उठविला आहे. शिवसेनेने आपण स्थानिकांसमवेत असल्याचे सांगून प्रकल्पाविरोधात आंदोलनाला सुरूवात केली आहे. नागपूर येथे सुरू असलेल्या अधिवेशनादरम्यान शिवसेनेचे आमदार राजन साळवी यांच्या नेतृत्वाखाली घोषणाबाजी झाली. यावेळी कोकणातील आमदारही उपस्थित होते.

खासदार विनायक राऊत यांच्या नेतृत्वाखाली राजापूर तालुक्यातील डोंगर तिठा ते चौके अशी दोन किलोमीटरची संघर्ष यात्रा झाली. सकाळी ११.३० वाजता या यात्रेला सुरूवात झाली. या यात्रेत परिसरातील ग्रामस्थानी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला. यात्रेला सुरूवात होताच मुसळधार पावसाला सुरुवात झाली. या पावसातच जोरदार घोषणाबाजी देत ही यात्रा सुरूच ठेवण्यात आली. या यात्रेत त्यांच्यासमवेत आमदार राजन साळवी, रत्नागिरीचे आमदार आणि शिवसेनेचे उपनेते उदय सामंत, जिल्हाप्रमुख राजेंद्र महाडिक यांच्यासह तालुक्यातील शिवसेनेचे पदाधिकारी सहभागी झाले होते. यावेळी भाजपा सरकारच्या आणि मोदींच्या विरोधात घोषणाबाजी करत प्रकल्प हटवण्याची मागणी करण्यात आली.

नारायण राणे यांची अवस्था ना घर का ना घाट का’ – विनायक राऊत

You might also like
Comments
Loading...