पीक विमा कंपन्यांविरोधात शिवसेना रस्त्यावर, आज मुंबईत मोर्चा

टीम महाराष्ट्र देशा : पीक विमा कंपन्यांविरोधात शिवसेना अधिकच आक्रमक झाली आहे. या विरोधात आज मुंबईत भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. या मोर्चात शेतकऱ्यांपेक्षा ‘शहरीबाबूं’नी मोठय़ा संख्येने सामील व्हावे व शेतकऱ्यांविषयी आपली कृतज्ञता व्यक्त करावी अशी इच्छा आजच्या सामनाच्या अग्रलेखातून व्यक्त करण्यात आली आहे.

वाचा काय आहे सामनाचा अग्रलेख…

Loading...

शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर महाराष्ट्राच्या राजधानीत मुंबईत आजच शिवसेनेचा मोर्चा निघत आहे. या मोर्चात शेतकऱ्यांपेक्षा ‘शहरीबाबूं’नी मोठय़ा संख्येने सामील व्हावे व शेतकऱ्यांविषयी आपली कृतज्ञता व्यक्त करावी अशी आमची इच्छा आहे. मुलाला आईविषयी जी ममता व लळा असतो तेच नाते ‘शहरीबाबूं’चे शेतकऱ्यांविषयी असायला हवे. वादळवारा, पूर, दुष्काळाचा सामना करीत आणि सुल्तानी कारभाराशी संघर्ष करीत शेतकरी मातीत राबतो, म्हणून शहरात आपण दोन घास खातो. शेतकरी हाच तुमचा-आमचा खरा अन्नदाता आहे. शेतकरी आज कर्जबाजारी झाला आहे. सततच्या अस्मानी संकटांमुळे शेतकरी ‘लाचार’ झाला आहे. तो आत्महत्येच्या कडय़ावर उभा आहे. तरीही त्याची श्रद्धा काळय़ा आईवर आहे. सरकारने ‘योजनां’च्या घोषणा करूनही त्याचा लाभ झारीतले शुक्राचार्य शेतकऱ्यांपर्यंत पोहोचू देत नाहीत. पीक विमा योजना हे त्या हेराफेरीचे उत्तम उदाहरण. मल्ल्या, मोदी, चोक्सी हजारो कोटींचा घोटाळा करून पळून जातात. पण शेतकऱ्यास त्याच्या हक्काचे ‘देणे-घेणे’ पीक विमा कंपन्या मिळू देत नाहीत. अशा मुजोर विमा कंपन्यांची कार्यालये मुंबईत आहेत. त्यांची मुजोरी मोडून त्यांना शेतकऱ्यांसमोर गुडघे टेकवण्यासाठी शिवसेनेचा आजचा मोर्चा आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील

चांद्यापासून बांद्यापर्यंतच्या

सर्व शेतकऱ्यांच्या कष्टाला, जिद्दीला आणि स्वाभिमानाला मानवंदना देण्यासाठी हा मोर्चा आहे. हिंदुस्थानी सैन्यात लढणारी, शहीद होणारी शेतकऱ्यांचीच मुले आहेत. बहुसंख्य जवानांचे माता-पिता हे शेतावर राबणारे आहेत. जवान निवृत्त होऊन खेडय़ात जातो तेव्हा तो काळय़ा आईच्या कुशीत विसावतो. आधी तो भारतमातेची सेवा करतो व शेवटी काळय़ा आईची सेवा करतो. पण शेतकरी आणि जवानांच्या राष्ट्रसेवेची आपण काय कदर करतो? सीमेवरील जवानांचे हौतात्म्य व शेतकऱ्यांच्या आत्महत्या हा देशासाठी चिंतेचा विषय ठरत नसून राजकारणाचा विषय ठरतो याचे आम्हाला दुःख वाटते. महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचे दुःख, दैन्य अस्वस्थ करणारे आहे. कापूस, हरभरा, ज्वारी, बाजरी, दूध, भाज्या, फळबागा, ऊस, द्राक्ष, डाळिंबाची उभी पिके कधी करपून जात आहेत तर कधी गारपिटीत आडवी होत आहेत. पण शेतकऱ्यांचा आक्रोश कधी मुंबईत म्हणजे महाराष्ट्राच्या राजधानीत पोहोचला आहे काय? महाराष्ट्राचे राजशकट ज्या मुंबईतून हलवले जाते त्या मुंबईवर सगळय़ात जास्त अधिकार राज्यातील शेतकऱ्यांचाच आहे. महाराष्ट्र अखंड राहावा, मुंबई महाराष्ट्राची राजधानी राहावी यासाठी झालेल्या प्रत्येक लढ्यात महाराष्ट्राचा शेतकरी आघाडीवर राहिला, त्याने प्राण गमावला, लाठय़ा खाल्ल्या, तुरुंगवास भोगला, अश्रुधुरांच्या नळकांडय़ा पचवल्या. तरीही ‘मुंबईसह महाराष्ट्र झालाच पाहिजे’ या घोषणा देत, शिवरायांचा भगवा खांद्यावर घेऊन तो लढत राहिला.

संयुक्त महाराष्ट्राचा लढा

साधा नव्हता. मुंबई महाराष्ट्रास मिळू नये यासाठी सर्व भांडवलदार, दिल्लीश्वर एकवटले होते. त्याविरोधात महाराष्ट्रात जो आगडोंब उसळला त्यांत शेतकरीच आघाडीवर होता. महाराष्ट्रासाठी झालेल्या 105 हुतात्म्यांत शेतकरी आहेत, शेतकऱ्यांची मुले आहेत. 1956 साली संयुक्त महाराष्ट्रासाठी बुलंद घोषणा देत दिल्लीच्या रस्त्यावर जो मोर्चा निघाला, त्या मोर्चाने संसदेवर धडक दिली. त्या दिल्लीतील मोर्चातही महाराष्ट्राचा कष्टकरी शेतकरी एकवटला होता. 1957 साली पंडित नेहरू प्रतापगडावर आले. त्यांची गाडी रोखणारे, त्यांना काळे झेंडे दाखवून गडावर सत्याग्रह करणारे व नेहरूंना घाम फोडणारे ‘शूरवीर’ म्हणजे महाराष्ट्रातून तेथे जमलेले बहुसंख्य शेतकरीच होते. सीमा लढ्यात मुंबईत हौतात्म्य पत्करणारे 69 शिवसैनिक हे शेतकरी कुटुंबातीलच होते व बेळगावात लढत असताना छातीवर गोळय़ा झेलणारेही सर्व शेतकरी होते. अशा या शेतकऱ्यांच्या रक्तातून, घामातून, त्यागातून मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र निर्माण झाला. त्या शेतकऱ्यांसाठी मुंबईत मोर्चा निघत आहे. शेतकऱ्यांची ‘कर्जमाफी’ची घोषणा झाली. पण तेथेही बँकांचे नियम-कानून झक मारीत आहेत. पीक विमा योजनांवर विमा कंपन्यांच्या मस्तवाल बोंडआळय़ा बसल्या आहेत. अशा प्रश्नांना वाचा फोडून शेतकऱ्यांना त्यांचे हक्क मिळवून देण्यासाठी शिवसेना मुंबईच्या रस्त्यावर उतरली आहे. शेतकरी नेहमीच आमच्यासाठी राबराब राबतो. आज मुंबईचा ‘शहरीबाबू’ शेतकऱ्यांसाठी रस्त्यावर उतरेल!

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

इतिहासावरून देवेंद्र फडणवीस-आदित्य ठाकरेंमध्ये जुंपली
'झारखंड निवडणुकीवेळी धोनीनं भाजपात प्रवेश न केल्याने BCCIने करारातून वगळले'
सुप्रिया सुळे यांनीही पहिला 'तान्हाजी', चित्रपट पाहून म्हणाल्या...
पाच वर्ष सरकार चालवायचं आहे लक्षात ठेवा;शरद पवारांचा संजय राऊतांना सूचक इशारा
मलाही बेळगाव पोलिसांनी मारहण केली होती : शरद पवार
सचिन सावंत संभाजी भिडेंवर बरसले, म्हणतात...
'माझे पप्पा' हा निबंध लिहून सर्वांच्या डोळ्याला पाणी आणणाऱ्या 'त्या' मुलाची धनंजय मुंडेंनी घेतली दखल
राष्ट्रवादीतून भाजपमध्ये आलेला 'हा' युवा आमदार बनला ठाणे शहर जिल्हा भाजप अध्यक्ष
‘सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी विरोधी पक्षातील भूमिकेतून बाहेर यावं’
मोठी बातमी : महाविकास आघाडीचं बिनसलं, कॉंग्रेस-राष्ट्रवादी आमने सामने